औरंगाबाद : रेशनवरील चना डाळ नुसतीच थाप ठरत आहे. प्रत्यक्षात कशाचाच पत्ता नसल्यामुळे दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणात नागरिक चना डाळीच्या केवळ आशेवर जगत आहेत. दरम्यान, चना डाळीचे भाव काय असावेत याबद्दल मात्र जोरात चर्चा आहे. त्याबद्दलचे रोज नवे परिपत्रक पुरवठा खात्यातर्फे निघत असून, या दराने चना डाळ खरेदी करून दिवाळी साजरी करायची तर डाळ उपलब्ध करून देण्यास शासन विसरले की काय, अशी एकूण परिस्थिती आहे. दरम्यान, औरंगाबाद शहरासाठी ५० टन चना डाळ उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती मिळते. शहरात १९९ रेशन दुकाने आहेत. या दुकानांद्वारे डाळीचे वाटप होईल. दिवाळी सणात चना डाळीची खरेदी सर्वाधिक केली जाते. २४ आॅक्टोबर रोजी ७८ रुपये किलोप्रमाणे चना डाळ रेशन दुकानांवर उपलब्ध होईल, असे शासनाचे पत्र आले. दुसऱ्या दिवशी ७० रु.प्रतिकिलोप्रमाणे विक्री करण्याचे पत्र आले. प्रत्यक्षात चना डाळीचा मात्र पत्ता नाही. दिवाळीसारख्या सणात डाळ शिजणार की नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. शासनाच्या वतीने चना डाळ ७८ नव्हे तर ७० रु. किलो दराने देण्याचा निर्णय दिलासादायक असला तरी डाळ कधी उपलब्ध होते याकडे लक्ष लागलेले आहे. शहरातील १९९ रेशन दुकानांवरच ही डाळ विकण्यात येणार आहे. १७ आऊटलेटचीही व्यवस्था करण्यात आली होती. सरकारने केवळ स्वस्त धान्य दुकानांवरच डाळींची विक्री करण्याचे आदेश दिले आहेत. रेशन कार्डाशिवाय प्रत्येकी एक किलो डाळ दिली जाणार आहे. खुल्या बाजारात सध्या चना डाळीचे भाव १५० ते १६० रु. प्रतिकिलो याप्रमाणे आहेत. हे दर परवडण्यासारखे नाहीत.शासनाने नियुक्त केलेल्या एनसीडीए कंपनीकडून औरंगाबाद शहरासाठी पाचशे क्विंटल चना डाळ उपलब्ध होणार आहे. प्रत्येक रेशन दुकानामधून अडीच ते तीन क्विंटल डाळ देण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. उद्यापर्यंत डाळ येईल, अशी शक्यता सूत्रांकडून व्यक्त होत आहे. ही डाळ शहरातील रेशन दुकानांमधूनच उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागातून ही डाळ उपलब्ध होणार नसल्याचेही समजते.
चना डाळ आलीच नाही ; दराबाबत मात्र जोरात चर्चा
By admin | Updated: October 27, 2016 00:53 IST