उस्मानाबाद : शासनाने निश्चित केलेला हमीभाव शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी आधारभूत हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आली होती. मागील काही महिन्यापासून आधारभूत केंद्राकडे शेतकऱ्यांचे लाखो रुपये थकल्याने शेतकरी हतबल झाला होता. मात्र बुधवारी नाफेडकडून फेडरेशनच्या खात्यावर ३ कोटी रुपये जमा झाले आहेत. हे पैसे बुधवारी संबंधित यंत्रणेकडे वर्ग करण्यात आल्याने गुरुवारपासून शेतकऱ्यांना पैशाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी मगर यांनी दिली. जिल्ह्यातील सहा आधारभूत खरेदी केंद्रांवर हरभऱ्याची खरेदी करण्यात आली होती . येथे खाजगी व्यापाऱ्यांपेक्षा जास्त दर मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांचा आधारभूत केंद्राकडेच कल दिसून येत होता. त्यामुळे दिवसाकाठी लाखो रूपयांची उलाढाल होत होती. सुरूवातीला पैसे वेळेवर मिळाले. परंतु, कालांतराने शेतीमालाचे पैसे मिळण्यास विलंब होऊ लागला. हरभऱ्याच्या बाबतीतही हेच घडले होते. दीड ते दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांना शेतीमालाचे पैसे मिळालेले नव्हते. याबाबत शेतकऱ्यांतूनही तीव्र संताप व्यक्त होत होता. या पैशासाठी आंदोलनेही झाली. अखेर हरभऱ्याचे तीन कोटी रूपये उपलब्ध झाले आहेत. नाफेडने हे पैसे फेडरेशनकडे जमा केले आहेत. त्यानुसार खामसवाडी येथील केंद्रासाठी ४० लाख रुपये, भूम ३० लाख, कळंब १० लाख , लोहारा ८० लाख , माडज ४० तर उस्मानाबाद केंद्रासाठीचे १ कोटी असे एकूण तीन कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. ही रक्कम बुधवारी फेडरेशनला उपलब्ध झाल्यानंतर ती लागलीच संबंधित केंद्राकडे वितरित करण्यात आली आहे. गुरूवारपासून संबंधित शेतकऱ्यांना ती वाटप करण्यात येणार असल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी आबासाहेब मगर यांच्याकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांचा जीव भांड्यातफेडरेशनकडे शेतीमाल घालूनही पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता. परंतु, ऐन पेरणीच्या काळात हरभऱ्याचे पैसे मिळाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. अनेक शेतकरी फेडरेशनच्या कार्यालयात पैशासाठी चकरा मारीत होते.
हरभऱ्याचे ३ कोटी उपलब्ध
By admin | Updated: July 10, 2014 01:00 IST