जालना : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी घटना बदलण्याची गरज नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यानी धनगरसमाजाच्या एस.टी. आरक्षण अंमलबजावणीसाठी पत्र केंद्र सरकारला दिल्यास आपण आठ दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्याकडून हा प्रश्न सोडवू असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जाणकर यांनी केले.येथील मा. फुलंब्रीकर नाट्यगृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्रदेश अध्यक्ष प्रल्हाद राठोड, बाळासाहेब दोडतले, भगवान सानप, येईल वाड, मराठवाडा प्रमुख ओमप्रकाश चितळकर आदींची उपस्थिती होती.यावेळी जिल्ह्यातील दहावी, बारावी, वैद्यकीय प्रवेश, शिष्यवृत्तीपरीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना जाणकर म्हणाले की, समाजातील गोरगरीब गुणवंत विद्यार्थ्यांनी असेच यश संपादन करून फक्त डॉक्टर, इंजिनियर न होता. आयपीएस, आयएएस अधिकारी, उद्योजक होण्यावर भर द्यावे. मोठी स्वप्न पाहुन मेहनत, जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करून यश संपादन करावे. यासाठी समाजातील गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत ही करू.धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेतच धनगर समाजाला एसटीचे आरक्षण दिलेले आहे. मात्र सरकारने मागील ६७ वर्षापासून र आणि ड च्या घोळामुळे या आरक्षणाची अमंलबजावणी केलेली नाही. विधानसभेची आचार संहिता लागण्यापूर्वी आठ दिवसांत राज्य सरकारने या बाबत निर्णय घेवून अहवाल केंद्र सरकारला पाठवावा, नसता त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशारा देवून ते म्हणाले की, काँग्रेस आघाडी सरकार या बाबत निर्णय घेतील असे वाटत नाही. त्यांचे रिमोट बारामतीत आहे.त्यामुळे समाजाने आपला मित्र कोण आणि शत्रु कोण याचा अभ्यास करावा. मराठा आरक्षणास आपला पाठिंबा होता. त्याच प्रमाणे धनगर समाजासही आहे. तसेच ब्राह्मण समाजाच्या आरक्षणासही आपला पाठिंबा असल्याचे जाणकर यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओमप्रकाश चित्तळकर यांनी केले. सूत्रसंचलन कैलास कोळकर यांनी केले.कार्यक्रमास देवीदास खटके, अॅड. झेड. बी. मिसाळ, शिवाजी तरवटे, दरगुडे, महादेव तेलंग, नारायण चाळगे अशोक तारडे, शिवप्रकाश चितळकर,अॅड. बी. बी. बीर, पांडुरंग कोल्हे, सोपान डोईफोडे, तुळशीराम कोरडे, भगवान लोहकरे, बाळासाहेब हाके, अशोक रौदाळे, गणेश रौदाळे, राजू वीर आदींची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)मुंडे यांच्यामुळेच महायुतीत दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच आपण महायुतीत आलो. विधानसभेच्या जागावाटपात एक दोन जागा कमी मिळाल्यातरी महायुती तोडणार नाही. आगामी सत्ताही महायुतीचीच असेलल्, असा विश्वास जानकरांनी व्यक्त केला.
...तर आरक्षणाचा प्रश्न आठ दिवसांत सोडवू- जाणकर
By admin | Updated: August 4, 2014 00:51 IST