औरंगाबाद : खरीप हंगामात खते आणि बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाने दहा भरारी पथके स्थापन केली आहेत. सध्या या पथकांमार्फत जिल्हाभरात तपासणी सुरू आहे. जादा दराने विक्री केल्याचे आढळल्यास किंवा शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास दुकानदाराचा विक्री परवाना निलंबित केला जाणार आहे. गरज भासल्यास फौजदारी कारवाईच्या सूचनाही या पथकाला देण्यात आल्या आहेत. गुणवत्तापूर्ण व माफक दरात बी-बियाणे, खते, औषधी देऊन मदतीचा हात देता येईल, यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक आणि आर्थिक लूट थांबविण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर एक आणि जिल्हा स्तरावर एक, अशी एकूण दहा भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. बियाणे, खते व कीटकनाशकांचे नमुने काढणे, अप्रमाणित नमुन्यांवर कायदेशीर कार्यवाही करणे, कायदेशीर बाबींचे उल्लंघन, संशयित निविष्ठा, बोगस अप्रमाणित निविष्ठा विक्री बंद आदेश देणे, जप्ती करणे ही कामे या पथकांमार्फत केली जात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात कीटनाशके, खते आणि बियाणांचे साडेतीनशेहून अधिक नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर कृषी विकास अधिकारी आणि तालुकास्तरावर पंचायत समितीत तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
... तर परवाना होणार निलंबित
By admin | Published: June 19, 2016 11:34 PM