लातूर : नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे, यासाठी राष्ट्रीय कृषी पीकविमा योजना सुरू करण्यात आली आहे. यावर्षी या योजनेंतर्गत पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकांकडे पाठ फिरविली आहे. गतवर्षी जवळपास २ लाख ९० हजार शेतकऱ्यांनी विमा भरला होता. यावर्षी तीन महिन्यांत केवळ दीड हजार शेतकऱ्यांनी विमा भरला आहे. राष्ट्रीय कृषी विमा योजनेअंतर्गत केंद्र शासन व राज्य शासनाच्या माध्यमातून रबी हंगाम २०१६-१७ साठी पीकविमा भरण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले होते. हा पीकविमा ७० टक्के जोखीम स्तराप्रमाणे भरता येणार असल्याचे सांगून बागायती गव्हासाठी २१७.८०, जिरायती ज्वारीसाठी १५८.४०, हरभरा १५८.४०, करडई १४५.२०, सूर्यफुलासाठी ३३० या प्रमाणे विमा हप्ता प्रति हेक्टरी बँकेत भरण्याचे आवाहन करण्यात आले. ज्वारी जिरायती व करडई हे पीक अहमदपूर तालुका वगळून इतर सर्व तालुक्यातील महसूल मंडळास लागू आहे. (प्रतिनिधी)
रबी पीकविम्याकडे शेतकऱ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2016 23:56 IST