श्यामकुमार पुरे
ऑन दी स्पॉट रिपोर्ट
सिल्लोड : केळगाव हे अडीच हजार लोकसंख्या असलेले गाव. हे गाव दोन दिवसांपासून जिल्हाभरात चर्चिले जात आहे. घटनाही तशीच गंभीर आहे. गावातील एका व्यक्तीने गावच्या महिला पोलीस पाटलावर वाईट नजर ठेवून अश्लील भाषेत तिला शिवीगाळ केली. विशेष म्हणजे अशा प्रकारचा त्रास तिला कायमच होत असल्याने पोलिसांकडे तक्रार करूनही कारवाई केली गेली नाही. अखेर त्या महिला पोलीस पाटलाने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले. त्याची व्हिडिओ क्लीप व्हायरल झाली. त्यानंतर दोन दिवसांत झालेल्या पोलीस कारवाईनंतर तिसऱ्या दिवशी गावात भयाण शांतता पसरली होती. गावाला छावणीचे स्वरूप आलेले आहे.
निर्मला बाळासाहेब हिवरे (32) हे विष प्राशन केलेल्या महिला पोलीस पाटलाने नाव आहे. ती आज मृत्यूशी झुंज देत आहे. तिला मानसिक त्रास दिला. या सर्व घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी आरोपी रामदास वाघ याच्याविरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा गुरुवारी दाखल केला; पण त्या आरोपीला लगेच जामीन मिळाला. ही भयावह घटना घडूनदेखील पोलिसांनी जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्याने आरोपीला जामीन मिळाला, असा आरोप केला जात आहे. त्यानंतर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील जोपर्यंत गावात येऊन आम्हाला न्याय देत नाहीत, तोपर्यंत आम्ही गावात ठिय्या मांडू, असे म्हणत शुक्रवारी रात्री पाचशे ते सातशे लोकांचा जमाव केळगावात चावडीवर जमला. रात्री दहा वाजेपर्यंतही पोलीस अधीक्षक केळगावात आल्या नाही. अखेर जमावाचा संयम सुटल्याने जमावाने आरोपी व तिच्या बहिणीच्या घरावर अचानक दगडफेक केली.
-----
गावात भयाण शांतता
शुक्रवारी रात्री पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे शनिवारी दिवसभर गावात भयाण शांतता पसरली होती. जवळपास नव्वद टक्के घरांना कुलूप लागलेले दिसले.
---
काय आहे प्रकरण
ज्या इसमाने महिला पोलीस पाटलाला आत्महत्येस प्रवृत्त केले त्या रामदास वाघचे वडील विठ्ठल वाघ हे केळगाव ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून कामाला होते. तीन वर्षांपूर्वी त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला; पण ग्रामपंचायतीकडून पैसे वसूल करण्यासाठी रामदास वाघने गावाचे सरपंच, उपसरपंच व पोलीस पाटील यांनी माझ्या बापाला मारहाण करून त्यांचा खून केला, असा आरोप केला; परंतु पोलिसांनी क्लीन चिट दिली होती. त्याचा राग धरून आरोपी वाघ महिलेला त्रास देत होता.
------
आता तरी न्याय द्या
सदर कुटुंब दोन- तीन वर्षांपासून आम्हाला त्रास देत आहे. नेहमीच्या त्रासाला कंटाळून माझ्या पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ती रुग्णालयात असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. पोलिसांनी आरोपीला पाठीशी घातले म्हणून हा प्रकार घडला. त्याउलट गावातील लोकांविरोधात खोटे गुन्हे दाखल केले. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, हीच मागणी राहील.
- बाळासाहेब हिवरे, पती (महिला पोलीस पाटील).
--------
लोकांनी कायदा हातात घेतला
सदर लोकांनी विनाकारण कायदा हातात घेतला. आम्ही आरोपीला अटक केली. त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले; पण न्यायालयाने त्याला जामीनवर सोडले. त्यात आमचा दोष नाही. लोकांनी पोलिसांवर हल्ला केला. आम्ही लाठी चार्ज केला नसता तर प्रकरण चिघळले असते. कायदा हातात घेणाऱ्या साठ लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलीस पाटलाने कधीही लेखी तक्रार पोलिसांना दिली नाही. पोलिसांवर बिनबुडाचे खोटे आरोप करण्यात येत आहेत.
- किरण बिडवे, सहायक पोलीस निरीक्षक, सिल्लोड ग्रामीण
--------
एका दृष्टिक्षेपात केळगाव :
आरोपीवर पहिले कारवाई झाली असती तर उद्रेक झाला नसता.
आरोपी वाघ कुटुंब भूमिगत झाले.
केळगावात छावणीचे स्वरूप आले आहे.
सगळीकडे पोलीस तैनात झाले.
गेल्या दोन दिवसांपासून या घटनेमुळे सिल्लोड तालुका हादरला आहे.
-----
फोटो :
१) केळगावात असलेली भयाण शांतता.
2) गावातील ओस पडलेले गाव.
3) रामदास वाघ यांच्या घरावर जमावाने दगडफेक केली. त्यात झालेली घराची अवस्था.
4) पोलिसांच्या वाहनांचे फुटलेले काच दिसत आहेत.
5) या घटनेत जखमी झालेले सहायक पोलीस निरीक्षक किरण बिडवे दिसत आहेत.