ईट : मुलगा विहिरीत पडून मयत झाला नसून, त्याचा घातपात करण्यात आल्याचा आरोप करीत संशयितांना ताब्यात घेण्याची मागणी घाटनांदूर (ता़भूम) येथील नागरिकांनी शनिवारी सकाळी लावून धरल्याने ईट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ दरम्यान, पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मयताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले़मिळालेल्या माहितीनुसार, घाटनांदूर शिवारातील जगदीश सासवडे यांच्या शेतातील विहिरीत शुक्रवारी सायंकाळी गणेश सुभाष बुरुंगे (वय-१८ रा़घाटनांदूर) याचा बुडून मृत्यू झाला़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी प्रेत विहिरीच्या बाहेर काढून ईट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते़ रात्री उशीर झाल्याने पार्थिवाचे विच्छेदन करण्यात आले नव्हते़ शनिवारी सकाळी वैद्यकीय अधिकारी डॉ़ भराटे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर आलेल्या प्राथमिक अहवालात युवकाचा मृत्यू हा बुडून झाल्याचे नमूद करण्यात आले होते़ दरम्यान, मयताच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या तोंडावर मार देवून जखमी करून विहिरीत टाकून दिल्याचा आरोप करीत संशयितास ताब्यात घेण्याची मागणी लावून धरली़ ही मागणी लावून धरत नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेण्यास नकार दिल्याने काही काळ रूग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़ त्यानंतर पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले़ बुरूंगे यांनी पोलिसांना रूग्णालयातच अर्ज लिहून दिला व त्यानंतर मयताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ याप्रकरणी हरिदास बाबासाहेब बुरुंगे यांनी दिलेल्या माहितीवरून वाशी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ तपास पोहेकॉ सुधाकर पवार हे करीत आहेत़ तर मयताचे वडिल अंत्यसंस्कारानंतर वाशी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेल्याचे समजते़ मात्र, रात्री उशिरापर्यंत कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत माहिती मिळू शकली नाही़ (वार्ताहर)
घातपाताच्या संशयाने तणाव
By admin | Updated: June 8, 2014 00:56 IST