महेश पाळणे , लातूरटेनिस व व्हॉलीबॉल खेळाचा संगम असलेला टेनिस व्हॉलीबॉल हा खेळ आता भारतासह विदेशातही खेळला जाऊ लागला आहे. येणाऱ्या दिवसांत जगातील प्रत्येक राष्ट्रात या खेळाचा प्रसार व प्रचार करावयाचा आहे. यासह एशियाड स्पर्धेत टेनिस व्हॉलीबॉलला घेऊन जाण्याचा निर्धार असल्याचे मत या खेळाचे जनक तथा अखिल भारतीय टेनिस व्हॉलीबॉलचे सचिव प्रा.डॉ. व्यंकटेश वांगवाड यांनी रविवारी व्यक्त केले.एका खाजगी कामानिमित्त प्रा. वांगवाड लातुरात आले असता त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. १९८५ साली त्यांनी स्वत: या खेळाला सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले, इतर खेळांच्या तुलनेत हा खेळ मनोरंजक आहे. वाढत्या वयातील मुलांच्या व्यक्तिमत्वात तर यामुळे सुधारणा होतेच. यासोबतच शारीरिक तंदुरुस्तीही वाढते. गतवर्षी नेपाळ व यंदाच्या वर्षी भूतान येथे या खेळांच्या स्पर्धा झाल्या. यासोबतच येणाऱ्या काळात वेस्ट र्इंडिज, कॅनडा, बँकॉक, सिंगापूर व मलेशियातही हा खेळ सुरू होणार आहे. आपले पहिले ध्येय म्हणजे या खेळाला आशियाई स्पर्धेत समाविष्ट करणे होय. शालेय स्पर्धेतही हा खेळ आहे. राज्यातही ३५ जिल्हे या खेळाशी संघटित आहेत. २००० साली सिडनी आॅलिम्पिकमध्ये या खेळाचे कॉन्फरन्समध्ये चित्रिकरणही दाखविण्यात आले. यासह बँकॉक व रशियातही याचा प्रसार झाला आहे. १७ वर्षांपासून सुरू असलेल्या या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवायचे आहे. २००० मध्ये आॅस्ट्रेलियाला जाताना माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आपल्या फंडातून या खेळाला मदतही केल्याचे सांगून मराठवाड्याचेच सुपुत्र गोपीनाथराव मुंडे यांना भारतीय संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमानही केले होते. मात्र दुर्दैवाने त्यांचे अकाली निधन झाल्याने आमच्या खेळाचा राजाश्रयच निघून गेल्याचेही त्यांनी सांगितले. मूळचे चाकूर तालुक्यातील आनंदवाडीचे असणारे डॉ. व्यंकटेश संतराम वांगवाड यांनी पुण्यातील चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयात एचओडी म्हणून उत्कृष्ट कार्य केले आहे.
टेनिस व्हॉलीबॉलला एशियाड स्पर्धेत घेऊन जाणार
By admin | Updated: August 19, 2015 00:03 IST