औरंगाबाद : मराठवाड्याची, पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागेवर बीओटी तत्त्वावर अद्ययावत आणि सुसज्ज बसस्थानक बांधण्यासाठी एस.टी. महामंडळाने कंबर कसली आहे. या कामासाठी मार्चमध्ये निविदा मागविण्यात आल्या होत्या, त्याला चार कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला आहे. निविदा प्रक्रिया विधानसभेच्या आचारसंहितेत अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होऊन निवडणुकीपूर्वी प्रत्यक्ष काम सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.मध्यवर्ती बसस्थानकाच्या इमारतीची दुरवस्था झाली असून, गेल्या दहा वर्षांपासून अद्ययावत बसस्थानक बांधण्याचे ‘गाजर’ महामंडळाकडून दाखविण्यात येत आहे. प्रारंभी बसस्थानक बांधण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या; परंतु आलेल्या निविदेतून महामंडळाला अपेक्षित उत्पन्न मिळणार नसल्याने निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली. त्यानंतर बीओटी तत्त्वावर अद्ययावत बसस्थानक बांधण्यासाठी २३ मार्च ते २३ मे २०१४ दरम्यान अद्ययावत बसस्थानक बांधण्यासाठी पुनर्निविदा काढण्यात आली.११ कंत्राटदारांनी निविदा खरेदी केल्या; परंतु प्रत्यक्षात केवळ ४ कंत्राटदारांनी निविदा दाखल केल्या आहेत. १८ जुलै रोजी निविदा उघडण्यात येणार असून, सर्व निविदा मुंबई येथे टेंडर कमिटीकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर निविदेवर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती एस.टी. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. (लोकमत ब्युरो)शहराची अब्रू वेशीवरमागील दहा वर्षांमध्ये मध्यवर्ती बसस्थानकाची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. प्रवाशांना कोणत्याच मूलभूत सोयी- सुविधा मिळत नाहीत. औरंगाबादकर मजबुरी म्हणून एस.टी.ने प्रवास करतात. शहरात येणारे पर्यटक, पाहुणे बसस्थानक पाहून शहर कसे असेल, याचा अंदाज एका क्षणात लावतात. पर्यटनाच्या राजधानीत किमान बसस्थानक तरी चांगले असावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. ही मागणी आता ‘आॅन रूट’ करण्यात आली आहे.
अद्ययावत बसस्थानकाची निविदा ‘आॅन रूट’!
By admin | Updated: June 25, 2014 01:25 IST