बीड : जिल्हा परिषद शाळांमधील दहा हजारांहून अधिक शिक्षकांचे दोन महिन्यांचे वेतन रखडले आहे. तांत्रिक घोळामुळे शिक्षकांना वेतनासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.जिल्हा परिषदेस फेबु्रवारी व मार्च महिन्यांचे शिक्षकांचे वेतन बिल आॅनलाईन प्राप्त झाले होते. ही बिले जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करण्यात आली होती. प्राथमिक शिक्षक, कंद्रप्रमुख व अनुदानित माध्यमिक विद्यालयांच्या शिक्षकांच्या वेतनापोटी अदा करावयाची रक्कम व तरतूद रक्कम यात फरक आला. त्यामुळे कोषागार कार्यालयाने बिले परत पाठविली. त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी दुरुस्ती करुन नव्याने बिले काढण्याचा प्रयत्न केला;परंतु तोवर आॅनलाईन बिले ‘डिलीट’ झाली होती. त्यामुळे आता वेतनासाठी नव्याने परवानगी घ्यावी लागणार आहे. यासंदर्भात सीईओ नामदेव ननावरे यांनी शिक्षण आयुक्तांना पत्र पाठवून शिक्षकांच्या वेतनाबिलासाठी नव्याने परवानगी देण्याची विनंती केली आहे. शिक्षणाधिकारी (प्रा.) शशीकांत हिंगोणेकर हे पुण्याला परवानगीसाठी गेले आहेत. ही परवानगी मिळाल्यावर वेतनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. (प्रतिनिधी)
शिक्षकांचे दोन महिन्यांचे वेतन रखडले
By admin | Updated: April 22, 2016 00:35 IST