हिंगोली : शिक्षकच या देशाचा व समाजाचा खरा मार्गदर्शक होवू शकतो. कारण बालपणापासून विद्यार्थी शिक्षकाचेच ऐकत असतो. म्हणून शिक्षकांनी नैतिक मुल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन पुणे आश्रमातील स्वामी कृपाघणानंद यांनी केले. येथील जि. प. प्रशालेत स्वामी विवेकानंद रथयात्रेनिमित्त स्वामी कृपाघणानंद यांचे ‘नैतीक शिक्षणाचे महत्व आणि गरज’ या विषयावर व्याख्यान झाले. शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना स्वामी कृपाघणानंद म्हणाले, अराजक परिस्थितीमध्ये केवळ सुजाण व समंजस नागरिक योग्य मार्ग काढू शकतो. म्हणून मुल्यात्मक शिक्षणाची गरज या देशाला पुन्हा नव्याने वाटू लागली आहे. शिक्षणाबरोबरच प्रेम, आदर, आई-वडील, गुरुजनांची सेवा, प्रामाणिक व्यवहाराचे संस्कार जर बालपणी रुजले तर ती मुले सुजाण नागरिक बनल्याशिवाय राहणार नाहीत. यामध्ये शिक्षकांचे योगदान मोठे असेल असेही स्वामी कृपाघणानंद यांनी सांगितले. तसेच त्यांनी स्वामी विवेकानंद यांचे बालपण, गुरू रामकृष्ण परमहंस यांच्या कृपादृष्टीचा विस्तृत परिचय उपस्थितांना करून दिला. आदर्श शिक्षकांचा सत्कार झाला. पवार यांनी स्वामी विवेकानंदाचे विचार शिक्षकांनी आत्मसात करावेत, असे सांगितले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. प्रेमेंद्र बोथरा तर स्वामी विवेकानंद गुरूकुलचे पंजाब गव्हाणकर यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी प्रकाश सनपुरकर, संतोष अर्धापूरकर, प्रा. संभाजी पाटील, प्रवीण बगडिया, अभिजित कोंडावर यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)