जालना : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आपसी बदल्यांना शासनाकडून कोणतीही अडचण नसताना गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या घोळाबाबत ‘लोकमत’ ने २६ मे रोजीच्या अंकातून लक्ष वेधल्यानंतर मंगळवारच्या स्थायी समिती सभेत जिल्हा परिषद प्रशासन नरमले. १ जून २०१५ पूर्वी २०११-१२ तसेच २०१४-१५ या वर्षातील पात्र शिक्षकांच्या आपसी बदल्या करण्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले.कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी ३ वाजता जि.प. अध्यक्ष तुकाराम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सभेस प्रारंभ झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, सभापती ए.जे. बोराडे, शहाजी राक्षे, लिलाबाई लोखंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, कॅफो चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. विरोधी गटनेते सतीश टोपे यांनी सुरुवातीलाच शिक्षकांच्या आपसी बदल्यांबाबत ‘लोकमत’ ने प्रकाशित केलेल्या वृत्ताकडे लक्ष वेधले. शिक्षकांच्या आपसी बदल्या करा, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर शिक्षण सभापती ए.जे. बोराडे यांनी आपण याच मुद्यावरून प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत असल्याचे सांगून ही बदली प्रक्रिया १ जूनपूर्वी पूर्ण करण्याची सूचना दिल्याचे सांगितले. शिक्षणाधिकारी गजानन सूसर यांनी १८ मे रोजीच्या शासन परिपत्रकानुसार शिक्षकांच्या आपसी बदल्या करता येणार आहेत, असे सांगून २०११-१२ मध्ये ज्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या, त्यातील पात्र शिक्षकांच्याही आपसी बदल्या करण्यात येणार आहेत, असे सांगितले. २०१४-१५ मधील पात्र शिक्षकांच्याही आपसी बदल्या करण्यात येणार असून यामध्ये शिक्षक, केंद्रप्रमुख, प्राथमिक पदवीधर, मुख्याध्यापक, माध्यमिक शिक्षक यांचा समावेश असल्याचे नमूद केले. त्यामुळे सुमारे ४०० शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत.परतूर व मंठा तालुक्यातील पांगरी गोसावी, कोकाटे हदगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याचा मुद्दा मांडून आष्टी येथे ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्याची मागणी राहुल लोणीकर यांनी केली. त्यावर सभापती बोराडे यांनी याविषयी आपण पालकमंत्री बबनराव लोणीकर व आ. अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत राज्याचे आरोग्यमंत्र्यांकडे याबाबतची मागणी केली असल्याचे सांगितले. मात्र त्याविषयीचा प्रस्ताव प्रशासनाकडून गेला नाही, याकडे लोणीकर यांनी लक्ष वेधले. संभाजी उबाळे यांनीही यावेळी काही मुद्दे उपस्थित केले. रामेश्वर सोनवणे यांनी ज्या प्रकल्पांमधून गाळ काढण्यात आलेला नाही, तेथे गाळ काढण्यासाठी निधीची तरतूद करावी, अशी सूचना केली. यावेळी सदस्यांनी विविध विषयांवरून प्रशासनास धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)मागील सभा तहकूब झाल्याने ही तहकूब सभा आज घेण्यात आली. २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पास सभागृहात अंतिम मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे कृषी विभागातर्फे मांडण्यात आलेल्या ४० लाखांच्या कडबा कुटी व ५० लाख रुपयांच्या फवारे खरेदीचा विषय फेटाळण्यात आला. ४जि.प. सदस्यांचा स्वेच्छानिधी म्हणून गाळ काढण्यासाठी प्रत्येक गटातून २ लाख याप्रमाणे १ कोटी १० लाख रुपयांच्या निधीबाबतही सदस्यांच्या इच्छेनुसार निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. हा स्वेच्छानिधी एकूण सात लाखांचा आहे. त्यापैकी २ लाख रुपये गाळ काढण्याच्या कार्यक्रमास देण्यात येणार होते.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून दरवर्षी पावसाळ्यात ज्या गावांमध्ये साथरोग उदभ्वतात तेथे आवश्यक प्रतिबंधात्मक कार्यवाही पावसाळा संपत आल्यानंतर होते. त्यामुळे यावर्षी ही कार्यवाही पावसाळ्यापुर्वी व्हावी, अशी मागणी लोणीकर यांनी केली. जिल्ह्यात ८० टक्के फॉगींग मशीन बंद आहेत. ब्लिचिंग पावडर नाही, या बाबीही त्यांनी निदर्शनास आणून दिल्या.
शिक्षकांच्या आपसी बदल्या सहा दिवसांत
By admin | Updated: May 27, 2015 00:39 IST