ऑनलाइन लोकमत औरंगाबाद, दि. 21 - राष्ट्रीय शालेय पोषण आहार योजनेंतर्गत मध्यान्न भोजन तयार करणाऱ्या ठेकेदारास त्यांच्या कामाचे बील देण्यासाठी १० हजाराची लाच घेताना नालंदा प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या दोन मुख्याध्यापक आणि सह शिक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडले. मुकुंदवाडीती परिसरातील मुकुंंदनगर येथील नालंदा शाळेत २१ एप्रिल रोजी दुपारी १.१५ वाजता ही कारवाई करण्यात आली.मुख्याध्यापक मुकुंद पुंडलीक जाधव (४६), मुख्याध्यापक संतोष सॅम्युअल पैठणे(४२) आणि सहशिक्षक सुर्यकांत बच्छाव(३८ )अशी आरोपींची नावे आहेत. याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्राप्त माहिती अशी की, मुकुंदनगर येथे नालंदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आहे. २०१५पासून या शाळेत तक्रारदार यांची संस्था शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजवून देण्याचे काम करते. त्यांच्या कामाचे ३३ हजार रुपयांचे बील शाळेकडे बाकी असल्याने आज दुपारी तक्रारदार यांनी मुख्याध्यापक जाधव आणि पैठणे यांची भेट घेतली आणि बीलाचा धनादेश देण्याची विनंती केली. यावेळी दोन्ही मुख्याध्यापकांनी त्यांना अनुक्रमे ६ हजार आणि ४ हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले आणि याविषयी तक्रार नोंदविली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी लाचेच्या मागणीची पंचासमक्ष पडताळणी केली तेव्हा दोन्ही मुख्याध्यापकांनी पंचासमक्ष लाचेची रक्कम शाळेत आणून देण्याचे सांगितले. यावरून साध्या वेशातील पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांनी शाळेच्या परिसरात दुपारी सापळा रचला. यावेळी तक्रारदारांकडून लाचेची रक्कम घेऊन ती कार्यालयातील शिक्षक बच्छाव यांच्याकडे त्यांनी दिल्यानंतर दबा धरून बसलेल्या पोलिसांनी तीनही आरोपींना लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले. पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक विवेक सराफ, हेमंत सोमवंशी, पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी हा सापळा रचला. त्यांना कर्मचारी गोपाल बरंडवाल, हरिभाऊ कुऱ्हे, संदीप आव्हाळे, रवी देशमुख, रविंद्र आंबेकर, संदीप चिंचोले यांनी मदत केली. मुकुंदवाडी ठाण्यात आरोपींविरूद्ध गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू होती.
नालंदा शाळेच्या दोन मुख्याध्यापकांसह शिक्षकाला लाच घेताना अटक
By admin | Updated: April 21, 2017 21:19 IST