औरंगाबाद : चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या संस्थेने सूरज ग्रुपशी करार करून अद्ययावत असे आॅनलाईन परीक्षा केंद्र उभारले आहे. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसह शासकीय, निमशासकीय संस्थेतील नोकऱ्यांसाठी उमेदवारांना आॅनलाईन परीक्षा देण्याची सुविधा या केंद्रामुळे उपलब्ध होणार आहे. १० आॅगस्ट रोजी पहिली परीक्षा या केंद्रावर होणार असल्याचे गु्रपचे संचालक गौरव मालपाणी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.अभियांत्रिकी, वैद्यकीय शाखांसाठी असलेल्या आॅनलाईन प्रवेश परीक्षा त्या केंद्रावर देणे शक्य होईल. तसेच रेल्वे, बँकिंग, केंद्र व राज्य शासनाच्या सेवांसाठी घेण्यात येणाऱ्या आॅनलाईन पात्रता परीक्षादेखील विद्यार्थ्यांना या केंद्रावरून देणे शक्य होणार आहे. ६० ते १०० जणांची रोजगार निर्मिती या केंद्राद्वारे होणार असून, संगणक क्षेत्रापासून व्यवस्थापन क्षेत्रातील उमेदवारांना येथे रोजगार मिळण्याची शक्यता आहे. ३५ हजार चौरस फुटांमध्ये तीन मजली इमारतीचे काम पूर्ण होत आले आहे. मार्च महिन्यात टीसीएसने त्यांच्या उपक्रमासाठी जागेचा शोध सुरू केला होता. २० मार्च रोजी सूरज गु्रपसोबत करार झाल्यानंतर तीन चार महिन्यांत इमारत पूर्ण होऊन इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यात आले आहे. टीसीएसने औरंगाबादेत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शहराचे नाव देशभराच्या आॅनलाईन सर्व्हिस प्रोव्हायडर नेटवर्क सिस्टीममध्ये येणार आहे. मराठवाड्यातील विद्यार्थी या केंद्रापर्यंत ४ तासांच्या आत येतील. त्यामुळे शिक्षण आणि रोजगाराशी निगडित सर्व आॅनलाईन परीक्षा त्यांना या केंद्रातून देता येणे शक्य होणार आहे. सूरज गु्रपचे मालपाणी म्हणाले, परवानगी मिळण्यासाठी अनेक अडचणी आल्या. परंतु पंतप्रधान व संबंधित विभागांशी ई-मेलद्वारे संपर्क केल्यानंतर एक आठवड्यात सर्व परवानग्या सहज उपलब्ध झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या संकल्पनेमुळे कामाला गती मिळाली. ४हे केंद्र सेवारत झाल्यानंतर मराठवाड्यात आयटी इन्फ्रास्ट्रक्चर वाढीस लागेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या केंद्रावर टीसीएससाठी स्ट्राँगरूम तयार करण्यात आली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर जरी गुंतवणुकीतून उभे राहिले असले तरी केंद्रातून घेतल्या जाणाऱ्या आॅनलाईन परीक्षांवर पूर्णपणे टीसीएसचे नियंत्रण असणार आहे. डाटा संकलन, निकाल, पारदर्शकता या बाबींवर पर्यवेक्षकांचे नियंत्रण असेल.
औरंगाबादेत ‘टीसीएस’
By admin | Updated: July 29, 2016 01:17 IST