उस्मानाबाद : शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी पालिकेकडून स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचा अवलंब केला जात होता. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवर ताण येत असे. परिणामी अतिक्रमणे हटविण्यास विलंब होत होता. हाच प्रश्न लक्षात घेवून आता अतिक्रमणे हटविण्यासाठी ‘टास्कफोर्स’ निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम एजन्सीला दिले जाणार आहे.पालिकेकडे अतिक्रमणाच्या तक्रारींचा सातत्याने ओघ असतो. परंतु, अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेकडे स्वतंत्र अशी यंत्रणा नसल्यामुळे अतिक्रमणे हटविण्यास विलंब होत होता. एखादी तक्रार आल्यानंतर स्पॉटला जावून पहाणी करून चौकशी करणे, त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर आदी पक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येत असे. परंतु, अनेकवेळा मोहिमेसाठी पुरेशे कर्मचारी उपलब्ध न झाल्यामुळे कार्यवाहीमध्ये अडथळे येत होते. हाच प्रश्न लक्षात घेऊन पालिकेने अतिक्रमण हटविण्यासाठी आता स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम आता एजन्सीकडे सोपविण्यात येणार आहे. त्यासाठीची निविदा पक्रियाही सुरू करण्यात आली आहे. परिणामी अतिक्रमण हटविण्यास प्रक्रियेस आता गती मिळेल, असा दावा केला जात आहे. (प्रतिनिधी)पालिकेकडे स्वतंत्र यंत्रणा नसल्याने अतिक्रमण हटविण्यासाठी स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत असे. याचा फटका शहरातील साफसफाईलाही बसत असे. हा प्रश्न लक्षात घेवून आता यासाठी ‘टास्क फोर्स’ निर्माण करण्यात येणार आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर अतिक्रमण हटाव मोहिमेस गती येईल, असे पालिकेचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
अतिक्रमण हटविण्यासाठी आता ‘टास्कफोर्स’
By admin | Updated: May 22, 2015 00:32 IST