औरंगाबाद : राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या (एनएचएम) सामूहिक शेततळ्यांसाठी जिल्ह्यातील फलोत्पादक शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. परंतु यंदा जुलै महिना संपत आला तरी चालू वर्षाचे जिल्ह्याचे उद्दिष्ट ठरलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा होत आहे.चार वर्षांपासून संपूर्ण जिल्हा दुष्काळात होरपळून निघत आहे. या पार्श्वभूमीवर फलोत्पादक शेतकऱ्यांना शेततळ्यांचे अधिकच महत्त्व वाटत आहे. राष्ट्रीय फलोत्पादक अभियानांतर्गत शेततळ्यांसाठी शंभर टक्के अनुदान मिळत असल्यामुळे या शेततळ्यांना आधीच भरपूर मागणी आहे. आता ही मागणी आणखी वाढली आहे. परंतु यंदा जुलै महिना संपला तरी या योजनेचा निधी किंवा उद्दिष्ट ठरलेले नाही. मागील वर्षी जिल्ह्यासाठी या योजनेंतर्गत जे शेततळ्यांचे उद्दिष्ट होते, ते उद्दिष्ट पूर्ण झाले. यंदा ही मागणी आणखी वाढली आहे. दररोज शेतकऱ्यांकडून कृषी विभागाकडे विचारणा होत आहे. परंतु उद्दिष्टच ठरलेले नसल्यामुळे अधिकाऱ्यांकडून त्यांना थांबण्याचा सल्ला दिला जात आहे. या योजनेत सामूहिक तत्त्वावर म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा जास्त फलोत्पादक शेतकऱ्यांना एक शेततळे मंजूर केले जाते. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांकडे फळबागा असणे आवश्यक आहे. या योजनेत शेततळे खोदणे आणि त्यात प्लास्टिक पन्नी टाकण्यासाठी शंभर टक्के अनुदान दिले जाते.
सामूहिक शेततळ्यांचे उद्दिष्ट ठरेना
By admin | Updated: July 27, 2016 00:50 IST