औरंगाबाद : महापालिकेने पाणीपुरवठ्याचे खाजगीकरण केल्यामुळे पहिला झटका आता नागरिकांना बसणार आहे, तो नवीन अर्धा इंची घरगुती नळ कनेक्शनसाठी मोजाव्या लागणाऱ्या १० हजार रुपयांच्या रूपाने. १ सप्टेंबरपर्यंत नवीन नळ कनेक्शन घेण्यासाठी ३ ते ७ हजार रुपयांपर्यंत रक्कम मनपा घ्यायाची. आता ती रक्कम १० हजार रुपयांहून अधिक लागणार आहे. ऐन दिवाळसणाच्या तोंडावर आणि विधानसभा प्रचाराच्या रणधुमाळीत औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने ‘नवीन नळ जोडणी आता सर्वांत सोपी,’ असे जाहीर करून नागरिकांच्या खिशात हात घालून साडेतीन हजार रुपयांहून अधिक रक्कम उकळण्याचा निर्णय घेतला आहे.५ वर्षांच्या काळात १० हजार रुपयांचे शुल्क हप्त्याने भरण्याची सवलत नागरिकांना देणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. नळ जोडणी आपल्या दारी असे सांगून कंपनीने मनपाच्या निर्देशानुसारच नवीन नळ कनेक्शन महाग होणार असल्याचे कळविले असले, तरी १० हजार रुपयांहून अधिकची रक्कम किती असेल हे कळविलेले नाही. त्यामुळे नवीन नळ कनेक्शन २० हजार रुपयांपर्यंतही जाऊ शकते. ग्राहकांच्या सोयीसाठी सोपी आणि पारदर्शक प्रक्रिया असल्याचा दावा कंपनीने केला आहे. सध्या ज्या भागामध्ये मनपाच्या जलवाहिन्या आलेल्या आहेत. तेथेच नवीन नळ कनेक्शन देण्यात येणार आहे. नवीन नळ जोडणी किती दिवसांत होईल, हे कंपनीने कळविलेले नाही.ही देण शिवसेना- भाजपाचीपाणीपुरवठ्याचे खाजगीकरण करण्याचा निर्णय शिवसेना- भाजपाने मिळून घेतला आहे. ७९२ कोटी रुपयांची समांतर जलवाहिनीची योजना तयार करून त्या युतीने औरंगाबादकरांच्या माथी ही योजना १३ लाख लोकांचा विरोध पत्करून लादली आहे. केंद्रातील तत्कालीन संपुआ व राज्यातील आघाडी शासनाने ४०० कोटी रुपयांचा निधी समांतर जलवाहिनीसाठी दिला. पीपीपी मॉडेलवरील या योजनेत औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्या मोबदल्यात मनपाने २० वर्षांसाठी कंपनीला पाणीपट्टी वसुली करणे, मीटर बसविणे, नळ कनेक्शन देणे, पाणीपुरवठा करणे, देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी दिली. शिवाय, जलवाहिनीचे काम झाल्यावर दर तीन वर्षांनी २५ टक्के पाणीपट्टी वाढ करण्याचा ठरावही मंजूर करून दिला. सध्या ३ हजार ५० रुपये पाणीपट्टी आहे. एप्रिल २०१५ पासून ३,५०० रुपये पाणीपट्टी होणार आहे. महापालिकेने मोठा गाजावाजा करून खाजगीकरण केले. याचे दूरगामी परिणाम औरंगाबादकरांना सहन करावे लागणार आहेत.
नळ कनेक्शन १० हजारांत
By admin | Updated: October 10, 2014 00:43 IST