शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ येथे घरणी नदीवर बांधण्यात येणाऱ्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यास प्रशासनाने नुकतीच ‘तांत्रिक’ मंजुरी दिली असून, जवळपास दीड कोटी खर्च अपेक्षित असलेल्या या बंधाऱ्याचा शिरूर अनंतपाळसह परिसरातील शंभर हेक्टर्स जमिनीला लाभ होणार आहे. त्यामुळे बंधाऱ्याचे काम लवकर पूर्ण व्हावे, यासाठी जलसंधारण महामंडळाकडे हस्तांतरीत करण्यासाठी शिफारस सुद्धा करण्यात आली आहे.शिरूर अनंतपाळ तालुका प्रकल्पाचा तालुका म्हणून ओळखला जात असला तरीही तालुक्यातील शंभर टक्के क्षेत्र सिंचनाखाली आलेले नाही. अद्यापि, असंख्य शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीवर अवलंबून रहावे लागते. यासाठी येथील घरणी नदीवर कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी शिरूर अनंतपाळसह परिसरातील शेतकऱ्यांनी गेली अनेक वर्षांपासून लावून धरली होती. ही मागणी पूर्ण करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एल.बी. आवाळे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ नुकतेच जलसंधारण मंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन जलसंधारण महामंडळाच्या वतीने या बंधाऱ्यास बजेट मंजूर करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. शिवाय, माजी राज्यमंत्री दिलीपराव देशमुख यांनीही जलसंधारण खात्याकडे बजेटची तरतूद करण्यात यावी, अशी शिफारस केली असल्याने जलसंधारण मंत्री नितीन राऊत यांनी तात्काळ बजेट मंजूर करण्याची हमी या शेतकरी शिष्टमंडळास दिली आहे.परिणामी, ‘तांत्रिक’ मंजुरी मिळालेल्या या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यास आर्थिक तरतूद होणार असल्याने शिरूर अनंतपाळ तालुक्याच्या सिंचन क्षेत्रात भर पडणार आहे. त्याचबरोबर गेली अनेक वर्षांपासूनची सामान्य शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होणार आहे. (वार्ताहर)या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शिरूर अनंतपाळसह परिसरातील शंभर हेक्टर्स जमीन सिंचनाखाली येणार असून, कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या बंधाऱ्याचा चांगलाच फायदा होणार आहे. जलसंधारण विभागाकडून ‘तांत्रिक’ मंजुरी मिळालेला हा बंधारा कधी पूर्ण होणार याकडे आता शेतकऱ्यांच्या नजरा आहेत.
शिरूर अनंतपाळच्या कोल्हापुरी बंधाऱ्यास ‘तांत्रिक’ मंजुरी
By admin | Updated: August 26, 2014 00:12 IST