औरंगाबाद : सिडको एन-२, ३, ४, जयभवानीनगर, संजयनगर, मुकुंदवाडी, चिकलठाणा परिसरातील रहिवाशांनी गुरुवारी अपुर्या पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ एन-६ मध्ये पाण्याचे टँकर तासभर अडवून ठेवले होते. महिलांनी सकाळी साडेअकरापासून तासभर हे आंदोलन चालविले. मनपाचे कनिष्ठ अभियंता एस. बी. राठोड यांनी महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु महिलांनी आजच पाणी सोडा, असा आग्रह धरला. दरम्यान, तेथे ‘ई’ व ‘एफ’ चे पाणीपुरवठा अधिकारी आय. बी. खाजा आले. त्यांनी आज रात्री पाणीपुरवठा करतो, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सिडको एन-२, ३, ४, जयभवानीनगर, संजयनगर, मुकुंदवाडी, चिकलठाणा या परिसरात सहा ते सात दिवसांनंतर पाणी दिले जाते, तेही कमी दाबाने. मनपा अधिकारी पाणीपुरवठ्यात भेदभाव करीत असल्याचा आरोप महिलांनी यावेळी केला. माजी नगरसेवक दामूअण्णा शिंदे म्हणाले की, ‘मनपाच्या कारभारात गोंधळ आहे. आमच्या परिसरात कोणता अधिकारी आहे, याचीही माहिती आम्हाला नाही. तो अधिकारी भेटत नाही. शहरात कुठे नियमितपणे, तर काही भागात पाच-पाच दिवसांनी पाणीपुरवठा होतो आहे. गेल्या वर्षी हर्सूल तलाव कोरडा पडला होता. जायकवाडी धरणातील पाणीसाठा कमी असताना नियमित पाणीपुरवठा केला जात होता. आता पुरेसे पाणी असूनही नियमित पाणी मिळत नाही.’ नगरसेविका सत्यभामा शिंदे, शोभा चव्हाण, कोमलताई बनकर, अलका दीक्षित, सुमन विसपुते, प्रीती धारूरकर, सुनीता पवार, विद्या वराडे, छाया वैद्य, सपना मातलंबडे, चंद्रकला मोरे, उषा जैन, हेमलता राठोड, सुनील जगताप, भागवत भारती, रामदास उशिरे, शरद कदम, सुचित सोनवणे, राहुल मुस्कावाड, प्रवीण आव्हाड, सुरेश पठाडे, पुष्कर येवले, शुभम शेजवळ आदी उपस्थित होते. आठ दिवसांपासून टोलवाटोलवी शहानूरवाडी, बीड बायपास, दिशानगरी परिसरातील रहिवासी टँकरने पाणीपुरवठा व्हावा यासाठी गेल्या आठ दिवसांपासून वॉर्ड कार्यालय ते मनपा, अशा खेट्या मारत आहेत. आम्ही नियमाप्रमाणे पैसे भरण्यासाठी तयार आहोत. अधिकारी मात्र, आठ दिवसांपासून टोलवाटोलवी करीत आहेत, असे नितीन मोरे यांनी सांगितले. पाणीपट्टी भरून पाणी का नाही शहराच्या अर्ध्या भागात नियमितपणे वेळेवर व गरजेपेक्षा जास्त वेळ पाणीपुरवठा होतो आहे. यामुळे अनेक भागांत रस्त्यावर पाण्याचे लोंढे दिसतात. आम्हाला मात्र, पाणीपट्टी भरूनही पाणी मिळत नाही, असा भेदभाव का? असा प्रश्न महिलांनी या अधिकार्यांना विचारला.
पाण्यासाठी अडविले महिलांनी टँकर
By admin | Updated: May 30, 2014 01:02 IST