बीड : दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढत आहे तसतसे पाणीटंचाई रौद्र रूप धारण करीत आहे. हातपंप, विहीर, बोअर तळ गाठू लागले आहेत. आज घडीला जिल्ह्यात २९७ टँकर सुरू आहेत. ग्रामस्थांच्या टँकर मागणीसाठी तहसील कार्यालयाला चकरा वाढू लागत असल्याचे चित्र गुरूवारी पहावयास मिळाले.मागील तीन वर्षांपासून पाणीपातळीत म्हणावी तशी वाढ झालेली नाही. परिणामी पाण्याचे स्त्रोत कोरडे पडू लागले आहेत. जिल्ह्यातील आष्टी, शिरूर कासार, पाटोदा, परळी या तालुक्यांमध्ये पाण्याची भीषण स्थिती आहे. गेवराई तालुका गोदाकाठी असतानाही येथील बोअर तळ गाठू लागले आहेत. महिलांना हंडाभर पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेण्याऐवजी पाणी आणण्यासाठी जुंपले जात आहे.पावणेपाच लाख नागरिकांना पाणीपुरवठाजिल्हा प्रशासन आजघडीला जिल्ह्यात ४ लाख ८३ हजार ६०८ नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करीत आहे. यामध्ये आष्टी तालुक्यात सर्वाधिक ८० टँकर सुरू आहेत. शिरूर कासारमध्ये १५ टँकरचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाईबाबत आढावा बैठक झाली. बैठकीमध्ये तहसीलदारांनी खिरापत वाटल्याप्रमाणे टँकर वाटू नयेत, अशी तंबी दिली होती. याचा परिणाम गावोगावच्या ग्रामस्थांना टँकरसाठी तहसील कार्यालयावर हेलपाटे मारावे लागत आहेत. (प्रतिनिधी)
टँकरने गाठला ३०० चा पल्ला
By admin | Updated: May 1, 2015 00:50 IST