खुलताबाद : तालुक्यात कोरोनाचे लसीकरण वाढवत त्यासाठी जनतेला प्रवृत्त करा. कारण खुलताबाद तालुक्यात लसीकरण
करणाऱ्यांची संख्या कमी असून ते वाढविणे गरजेचे आहे. लसीकरणाबाबत गैरसमज पसरविणाऱ्यांनी कारवाई करण्याचे सुतोवाच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी खुलताबादेत केले.
शनिवारी चव्हाण यांनी कोविड केअर सेंटरची पाहणी करत उपचार घेत असलेल्या रुग्णांना अडीअडचणी जाणून घेतल्या.
तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. त्याअनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. ग्रामीण रुग्णालयात जाऊन पाहणी करत तालुका व आरोग्य प्रशासनास कोरोना लसीकरण वाढविण्याचे निर्देश दिले. लसीकरण करण्यासाठी नागरिकांत असलेले गैरसमज दूर करत नागरिकांना यासाठी प्रवृत्त करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष ॲड. एस.एम. कमर, माजी नगराध्यक्ष ॲड. कैसरोद्दीन, दर्गा कमिटीचे अध्यक्ष फजीलत अहेमद, शरफोद्दीन रमजानी, नगरसेवक मुनीबोद्दीन, प्रा. शेख हुसनोद्दीन यांच्याशी चर्चा करून कोरोना लसीकरणाबाबत लोकांत जनजागृती करून त्याचे महत्त्व पटवून देण्याचे आवाहन केले. यावेळी तहसीलदार सुरेंद्र देशमुख, गटविकास अधिकारी प्रवीण सुरक्षा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास जगताप, डॉ. संतोष नाईकवाडे, पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे, मुख्याधिकारी संतोष आगळे, नायब तहसीलदार पी.बी. गवळी आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
-- फोटो : कोरोना लसीकरणाबाबत लोकप्रतिनिधींशी चर्चा करताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण.