बालाजी आडसूळ ल्ल कळंबशहरातील मांजरा नदीच्या खोलीकरणाचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे़ या खोलीकरण कामात ‘विष्णू कुंडा’ने देखील मोकळा श्वास घेतला आहे. खोलीकरणादरम्यान कुंडात एक शिलालेख सापडला असून, यावरून सदर कुंड सन १८१५ सालचा म्हणजेच २०१ वर्षापूर्वीचा असल्याचे दिसून येत आहे़ शिवाय या कुंडात केवळ १५ फुटांवर पाणी उपलब्ध झाले आहे़मांजरा नदीच्या खोलीकरणाचा ध्यास शहरवासीयांनी घेतला आहे. लोकसहभागाच्या माध्यमातून या नदीच्या पुनरूज्जीवन मोहीमेस चळवळीचे स्वरूप आले आहे. महाराष्ट्र दिनापासून या कामाचा प्रत्यक्षात सुरुवात झाली असून आजच्या स्थितीत कामाने चांगलीच गती घेतली आहे. शहरातील चोंदे गल्ली, कसबा भागात दक्षिण मुखी हनुमान मंदिर व पुरातन महादेव मंदिर आहे. या महादेव मंदिरालगत एक कुंड होता. मूळ कळंबवासीय या कुंडाला ‘विष्णू कुंड’ यानावाने ओळखतात. तसेच या कुंडाला बारमाही पाणी होते व या ठिकाणी पाय धुवूनच लोक मंदिरात दर्शनासाठी जात होते, असे जाणकार सांगतात. मांजरा पात्रालगत असलेला हा विष्णू कुंड दोनशे वर्षांपूर्वीचा आहे.खोलीकरणादरम्यान याठिकाणच्या चिरेबंदी तटबंदीत एक दगडी शिलालेख उघडा पडला असून, यात कुंडाचे व नाव साल सन १८१५ चा उल्लेख आहे. यामूळे हा कूंड होळकर घराण्याच्या काळातील असावा असा अंदाज बांधला जात आहे. अवर्षणातही झरा प्रवाहीविष्णू कुंडाचे चिरेबंदी बांधकाम करण्यात आलेले असून, आत उतरण्यासाठी पायऱ्यांचे टप्पे आहेत. खोलीकरणावेळी या कुंडातील गाळ काढण्यात आला असून, जवळपास पंधरा फूट लांब, रुंद व खोलीचा हा कुंड मोकळा झाला आहे. सध्याच्या कठीण अवर्षण काळात शेकडो फूट खोलीपर्यंत पोहचूनही पाणी हाती लागणे दूर्मिळ असताना या कुंडात केवळ पंधरा फूट खोलीवर पाणी उपलब्ध झाले आहे. सद्यस्थितीत एक झरा अव्याहत प्रवाही असून, याठिकाणच्या पायऱ्यांवरील तसेच कुंडातील गाळ काढून खोली वाढवण्यात येणार असल्याचे हर्षद अंबुरे, गजानन चोंदे यांनी सांगितले.
२०१ वर्षांपूर्वीच्या कुंडाने घेतला मोकळा श्वास
By admin | Updated: May 10, 2016 00:09 IST