लातूर : राज्यात स्वाईन फ्लूने थैमान घातले असून, लातूर जिल्ह्यात दोन महिन्यांत १६ जणांचा बळी घेतला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल होते. आता तापमानाचा पारा वाढल्यामुळे एच१ एन१ व्हायरसची संक्रमण सक्रियता कमजोर होत आहे. परिणामी, लातूर जिल्ह्यात आता रुग्णसंख्या घटत आहे. सध्या जिल्ह्यात पॉझिटिव्ह दोन आणि संशयित सात असे एकूण ९ रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांची प्रकृतीही झपाट्याने सुधारत असून, पुढील दोन-तीन दिवसांत त्यांना रुग्णालयातून सुटीही मिळेल, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात स्वाईन फ्लू कक्षात दोन स्वाईन फ्लू बाधीत रूग्णासह चार संशयित रूग्णावर उपचार करण्यात येत आहेत़ तर उदगीर उप जिल्हा रूग्णालयातील स्वाईन फ्लू कक्षात एका स्वाईन फ्लू संशयित रूग्णावर उपचार करण्यात येत आहेत़ तर निलंगा उप जिल्हा रूग्णालयात एका संशयित रूग्णावर उपचार करण्यात येत आहेत़ लातूर शहरातील एक खासगी रूग्णालयात एका स्वाईन फ्लू संशयित रूग्णावार उपचार करण्यात येत आहे़ मागील चार दिवसांपासून उन्हाचा पारा वाढल्याने स्वाईन फ्लू रुग्णसंख्येत घट होत आहे़ सध्या रुग्णालयात फक्त नऊ रुग्ण आहेत. त्यांचीही प्रकृती झपाट्याने सुधारत असून, पुढील दोन दिवसांत त्यांना रुग्णालयातून सुटी मिळणार आहे. (प्रतिनिधी) स्वाईन फ्लूची रुग्णसंख्या लातूर जिल्ह्यात वाढल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला होता. रुग्णालयातील यंत्रसामुग्री आणि पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे आरोग्य विभागासमोर आव्हान उभे टाकले होते. आरोग्य विभागाने उदगीर, निलंगा, उपजिल्हा रुग्णालय तसेच मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयात स्वाईन फ्लू कक्ष स्थापन केले आहेत. यामुळे स्वाईन फ्लू आजार कमी करण्यात आरोग्य विभागाला यश आले. सध्या स्वाईन फ्लूचा व्हायरस तापमानामुळे कमजोर झाला आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत घट झाली आहे.
स्वाईन फ्लू आटोक्यात
By admin | Updated: March 19, 2015 23:55 IST