शिरीष शिंदे , बीडमुंबई, पुणे आणि लातूरसह इतर शहरात झपाट्याने पसरलेल्या स्वाईन फ्ल्यू साथीचे लोण आता बीडपर्यंत येऊन पोहचले असून सर्दी, खोकला व ताप अशी लक्षणे असलेल्या ११ रुग्णांपैकी ७ जणांना याची बाधा झाल्याचे आढळÞून आले आहे. १२ फेब्रुवारीला स्वाईन फ्ल्यूचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर ही संख्या ७ पर्यंत गेल्यामुळे जिल्हा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. उपचारानंतर तीन जणांना सुटी देण्यात आली. मात्र, चार नवे रुग्ण दाखल झाले असून त्यांच्यावर संसर्गरोधी कक्षात उपचार सुरू आहेत. हा आजार घातक व संसर्गजन्य असला तरी उपचाराने बरा होणारा आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र, सर्दी, खोकला, घशात खवखव आणि ताप असल्यास डॉक्टरला जरूर दाखवावे, दुखणे अंगावर अजिबात काढू नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक अशोक बोल्डे यांनी केले आहे. राज्यातील स्वाईन फ्ल्यू रूग्ण आणि मृतांंची संख्या वाढत चालल्यामुळे नागरिकांत दहशत पसरलेली आहे. हा आजार शेजारच्या लातूर जिल्ह्यात थैमान घालत असताना बीडला एकही रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे बीडवासीयांना सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र, हा निश्वास औटघटकेचा ठरला. १२ फेबु्रवारीला पहिला रुग्ण आढळल्यानंतर १८ फेब्रुवारीपर्यंत ही संख्या ७ रुग्णांपर्यंत वाढत गेली. आतापर्यंत ११ जणांच्या स्वॅबचे नमुने पुण्याला पाठविण्यात आले होते. त्यापैकी ७ नमुने पॉझिटीव्ह (स्वाईन फ्ल्यूची बाधा झालेले) तर चार नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. पहिल्या तीन रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. मात्र, त्यांच्यासह सध्या दाखल रुग्णांचे कुटुंबिय व त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांवर नजर ठेवण्यात येत आहे. २०१२-१३ मध्ये चार रूग्णांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाली होती २०१५ मध्ये ही संख्या आताच जवळजवळ दुप्पट झाली आहे. जिल्हा रूग्णालयात बैठकखा. डॉ. प्रीतम मुंडे व जिल्हाधिकारी यांच्या सूचनेवरून जिल्हा रूग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बोल्डे, आयएएम अध्यक्ष डॉ. खोसे, डॉ. सी. ए. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील सर्व खाजगी व सरकारी डॉक्टरांची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीदरम्यान स्वाईन फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी व उपचाराबाबत मार्गदर्शन केले. बैठकीस अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महानंदा मुंडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मोगले, डॉ. सी. ए. गायकवाड, डॉ. सुभाष जोशी, डॉ. सोनवणे, डॉ. पी. के. कुलकर्णी, डॉ. यु. डी. कुलकर्णी, डॉ. निऱ्हाळी, डॉ. पांगरीकर आदी उपस्थित होते.
बीड जिल्ह्यातही स्वाईन फ्ल्यूचा शिरकाव
By admin | Updated: February 20, 2015 00:09 IST