परंडा : दरवर्षी शाळा सुरु होऊन पंधरा दिवसांचा कालावधी लोटला तरी विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तके पडत नसल्याने अभ्यासक्रम सुरू करण्यास अडचणी येत असल्याचे चित्र तालुक्यातील अनेक शाळांत दिसत होते. परंतु, यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे व त्यासोबतच स्वाध्याय पुस्तिकांचेही वाटप केले जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत दरवर्षी तालुक्यातील जिल्हा परिषद तसेच खाजगी अनुदानित शाळांतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. यावर्षीच्या सत्रात १६ जूनपर्यंत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १३९ शाळांसह खाजगी शाळांमध्ये पाठ्यपुस्तके पोहोचविण्याचे नियोजन तालुका शिक्षण विभागाने केले आहे. यासाठी गटशिक्षण अधिकारी जाधव यांनी केंद्र प्रमुखांची बैठक घेऊन सूचनाही दिल्या आहेत. सर्व शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बालभारती प्रकाशनाच्या वतीने लातूर याठिकाणाहून पाठ्यपुस्तकाचा पुरवठा होणार आहे. दरम्यान, तालुक्यातील जिल्हा परिषद, खाजगी अनुदानित अशा १४५ शाळासाठी तालुक्याच्या शिक्षण विभागाकडून स्वाध्याय पुस्तिकांचीही मागणी करण्यात आली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्याच्या हातात स्वाध्याय पुस्तिका देण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यतच्या १७ हजार २३५ विद्यार्थ्याना ही स्वाध्याय पुस्तिका दिली जाणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना पोषण आहारही दिला जाणार आहे. पोषण आहारासबंधीचे धान्य प्रत्येक शाळास्तरावर पोहोचविण्यात आल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले. (वार्ताहर) गणवेशासाठी २७ लाख ११ हजार सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत यावर्षीच्या शैक्षणिक सत्रात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्याना प्रत्येकी दोन गणवेश पुरविण्यात येणार आहेत. यासाठी शिक्षण विभागाने २७ लाख ११ हजार रुपयाची तरतूद केल्याची माहिती गटशिक्षण अधिकारी जाधव यांनी दिली. सर्व शिक्षा अभियान व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्याच्या गणवेशाचा खर्च केला जाणार आहे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या दोन गणवेशासाठी चारशे रूपये खर्च होणार आहेत. शिक्षकांची उपस्थिती १३ जूनपासून शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेश दिंडी काढून गणवेश, पाठ्यपुस्तके देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. १०० टक्के मुला-मुलींना पहिल्याच दिवशी प्रवेश दिला जाणार आहे. शाळा १६ जून पासून सुरु होणार असली तरी शिक्षक हे १३ जूनपासून शाळेवर उपस्थित राहणार आहेत. या कालावधीत शाळा व्यावस्थापन समितीची बैठक घेण्यात येणार असून, शाळेसह परिसराची स्वच्छता केली जाणार आहे. पहिल्याच दिवशी अध्यायन, अध्यापनही सुरु केले जाणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी ए. एम. जाधव म्हणाले.
पहिल्या दिवशी पुस्तकांसोबतच मिळणार स्वाध्याय पुस्तिका
By admin | Updated: May 14, 2014 23:56 IST