औरंगाबाद : जायकवाडीसह जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना रविवारी दिले. जिल्ह्यातील सर्व कालव्यांची जलवहन क्षमता वाढविण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांचे नुकसान झाले आहे. किती नुकसान झाले आहे, किती खर्च लागेल, हे सर्वेक्षणानंतर समोर येईल, असेही त्यांनी सांगितले.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची बैठक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत जलसंपदा मंत्री पाटील म्हणाले, जायकवाडी धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याची दुरुस्ती करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. या कालव्यांची जलवहन क्षमता कमी झाल्याने या क्षेत्राचे संपूर्ण सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले असून, प्रस्ताव प्राप्त होताच तो जागतिक बँकेकडे पाठविण्यात येईल.
खा. जलील यांच्या मागणीवरून तापी आणि गोदावरी महामंडळाची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. आ. बोरनारे यांनी वैजापूर तालुक्यातील सेनी देवगाव उच्च बंधारा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व परवानग्या लवकर देण्याची मागणी केली. तसेच नारंगी-सारंगी धरणामध्ये पालखेड धरणाचे ओव्हर फ्लो होणारे पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, शिवना टाकळी धरणाची अनेक कामे अर्धवट आहेत, ती लवकर पूर्ण करावीत. जेणेकरून तालुक्यातला पाणी मिळेल. मण्यार धरणाची उंची वाढवावी, अशीही मागणी केली. आ. बागडे यांनी यावेळी फुलंब्री परिसरातील जल प्रकल्पाच्या क्षेत्रातील जमीन संपादनाबाबत असलेला अडथळा दूर करण्याची सूचना केली.
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खा. इम्तियाज जलील, आ. हरिभाऊ बागडे, आ. अंबादास दानवे, आ. सतीष चव्हाण, आ. रमेश बोरनारे, आ. विक्रम काळे, आ. उदयसिंह राजपूत, आ. संजय शिरसाट, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे या बैठकीत उपस्थित होते.