परभणी : ० ते १८ वयोगटातील अंगणवाडी व शालेय विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत बाल स्वास्थ्य कार्यक्रमात परभणी जिल्ह्यात मागील सहा महिन्यात ४०० विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या़ यामध्ये हृदयरोग, कान, नाक, घसा व विविध आजारांच्या शस्त्रक्रिया रुग्णालयामार्फत करण्यात आल्या़ यामुळे अनेकांच्या मूळ आजारावर वेळीच उपचार करून पायबंद करण्याचे प्रयत्न झाले आहेत़ राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम परभणी जिल्ह्यात २०१३ पासून सुरू करण्यात आला आहे़ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अंगणवाडी, शालेय बालकांच्या आरोग्य संवर्धनाची व विकास साधण्याची भूमिका राबविण्यात येत आहे़ यात बालकांच्या आरोग्याची तपासणी, त्यांच्यात आढळणाऱ्या मूळ आजाराचे निदान करून पायबंद घालणे हा मुख्य उद्देश आहे़ या कार्यक्रमात ० ते १८ वयोगटातील बालकांची तपासणी करण्यात येते़ परभणी जिल्ह्यात १ हजार ४११ शाळा असून, या शाळांपैकी १ हजार २७३ शाळांची तपासणी आतापर्यंत आरोग्य पथकामार्फत करण्यात आली आहे़ तपासणीसाठी संपूर्ण जिल्ह्यात २१ पथके निर्माण करण्यात आली आहेत़ प्रत्येक तालुकास्तरावर पथक कार्यान्वित असून, पथकामध्ये एक पुरुष वैद्यकीय अधिकारी, एक स्त्री वैद्यकीय अधिकारी, एक परिचारिका व एक औषध निर्माता नियुक्त करण्यात आले आहे़ आतापर्यंत जिल्ह्यातील शाळांमध्ये झालेल्या तपासणीतून १ लाख ८२ हजार ५९६ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली़ यातील ३५६ विद्यार्थ्यांवर भूल देऊन वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या तर ३८ विद्यार्थ्यांच्या हृदयरोगाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या़ मागील सहा महिन्यात जिल्हाभरात या योजनेने गती घेतली असून, विद्यार्थ्याचे आरोग्य सुदृढ रहावे, याकरीता परभणीसह औरंगाबाद, मुंबई येथे विद्यार्थ्यांना मोफत नेऊन त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत़ (प्रतिनिधी) योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य आरोग्य विषयक समस्या, अडचणींचे निवारण करणे, योग्य ती संदर्भ सेवा रुग्णास मिळवून देणे, किरकोळ व गंभीर आजारावर वैद्यकीय उपचार करीत त्वरीत शस्त्रक्रिया करून घेणे व त्याचा पाठपुरावा करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य आहे़ तसेच तपासणीमध्ये बालकांतील जन्मत: असलेले व्यंग शोधणे, बालकांच्या शरिरातील पोषण मूल्यांची कमतरता शोधणे, शारीरिक व मानसिक विकासात्मक विलंब शोधणे व आजाराचे निदान शोधून त्यावर उपचार करणे हे काम करण्यात येते़
४०० विद्यार्थ्यांवर सहा महिन्यांत शस्त्रक्रिया
By admin | Updated: December 15, 2015 23:45 IST