उमरी : पुनर्वसन घरांच्या बांधकामात व्यत्यय आणण्याऐवजी गावकऱ्यांनी प्रशासनाला तसेच कंत्राटदारास सहकार्याची भावना ठेवल्यास दर्जेदार व सुविधायुक्त गावाची उभारणी होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले.तालुक्यातील बिजेगाव येथील पुनर्वसनाच्या घरबांधकामाची जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी पाहणी केली. यावेळी आ. वसंतराव चव्हाण, भूसंपादन अधिकारी मोतीयाळे, उपविभागगीय अधिकारी धरमकर, तहसीलदार टी. ए. जाधव, गोविंदराव सिंधीकर, गटविकास अधिकारी व्ही. आर. कोंडेकर, नायब तहसीलदार जाधव, जीवन प्राधीकरण, सार्वजनिक बांधकाम, कृषी आदी विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. बांधकाम पूर्ण झालेल्यांपैकी काही घरे नादुरुस्त झाली. फरशी फुटली, घरात खड्डे पडले, खडकावर बांधकाम झाल्याने काही घरात खडक जैसे थे आहे. दारे, खिडक्या गंजून खराब झाली व मोडकळीस आली. गावकऱ्यांनी प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांना हा प्रकार दाखविला. जी घरे दर्जाहीन आहेत व तेथे मोडतोड झाली तेथे तत्काळ दुरुस्ती करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. जेवढे घरे पूर्ण झाली त्या घरात लोकांनी वास्तव्य केल्यास त्याची योग्य प्रकारे देखभाल होईल व बांधकामासाठी पडलेले व इतर साहित्यांची चोरी होणार नाही. त्यासाठी गावकऱ्यांतून, अधिकारी यांची एक स्थानिक समिती बनविण्यात यावी.समितीने केलेल्या सुचनेनुसार प्रशासन योग्य निर्णय घेईल. पर्यायाने बिजेगावचे गेल्या सहा वर्षांपासून रेंगाळलेले पुनर्वसनाचे काम सर्व सुविधांसह दर्जेदार पूर्ण होईल. त्यासाठी सर्व गावकऱ्यांनी सहकार्य करावे. कामाच्या दर्जाबाबत दक्षता घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी यांनी केली. प्रास्ताविक उपसरपंच दत्तात्रेय बिजेगावकर यांनी केले. (वार्ताहर)उमरीत २२० घरकुले पूर्णबिजेगाव येथील पुनर्वसनाचे काम सन २००८ साली सुरु झाले. एकूण २७४ घरांचे बांधकाम, अंगणवाडी, शाळा, रस्ते, विद्युत व्यवस्था, पाण्याची टाकी आदी कामांचा यात समावेश आहे. सध्या २७४ पैकी २२० घरांचे बांधकाम पूर्णत्वास आले. पुनर्वसनात बांधण्यात येणाऱ्या घरांचा एकूण अंदाजित खर्च ८.५ कोटी एवढा आहे. विविध कारणांमुळे रेंगाळलेले बांधकाम पूर्ण करण्याची मागणी गावकऱ्यांतून होत आहे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी येथे प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली.
पुनर्वसनासाठी सहकार्य
By admin | Updated: July 13, 2014 00:24 IST