औरंगाबाद : जिल्ह्यातील साखर पुरवठादारांचे ९ कोटी रुपये थकले आहेत. मागील वर्षी ४ कोटींचा निधी मंजूर होऊनही पुरवठा विभागाकडून ती रक्कम साखर नॉमिनींना न दिल्याने ती परत गेल्याचा आरोप होत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही सरकारकडून ही रक्कम मिळत नसल्याने नॉमिनींनी उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी सुरू केली आहे. साखर पुरवठा करण्यासाठी वाहतूक कमिशन, वेळोवेळी वाढविण्यात आलेले कमिशन, तसेच १० ते २० टक्के वाहतुकीसाठी केलेली कपात, १० टक्के मार्जिन मनी, नॉमिनीकडून घेण्यात आल्यानंतरही पुरवठा विभागाकडून ही रक्कम नॉमिनींना परत करण्यात आलेली नाही. २००१ पासून मार्र्जिन मनी घेण्यात आले, तर २००५ पासून २०१४ पर्यंत १० टक्के कपात केलेली रक्कम थकली आहे. साखर नॉमिनींचे स्वतंत्र रेकॉर्ड जिल्हा पुरवठा कार्यालयात ठेवण्यात आले असले तरी हे रेकॉर्ड सापडत नसल्याने कर्मचाऱ्यांसह नॉमिनी हैराण झाले आहेत. या रेकॉर्डमध्ये प्रत्येक नॉमिनींच्या थकीत रकमेची कागदपत्रे असून, त्याआधारे ही रक्कम मिळणार आहे. परंतु रेकॉर्ड गायब झाल्यामुळे पुरवठा विभागासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. साखर नॉमिनींची थकीत रक्कम देण्यास पुरवठा विभागाकडून टाळाटाळ होत असल्याने नॉमिनींनी उच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. वर्षभरापासून पाठपुरावा करूनही रक्कम मिळालेली नसल्याचे नॉमिनींनी सांगितले.
पुरवठादारांचे नऊ कोटी रु. थकले...
By admin | Updated: December 17, 2015 00:17 IST