बीड : जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार अनिल पारसकर शुक्रवारी स्वीकारणार आहेत. यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांची बीड येथे नुकतीच बदली करण्यात आली आहे. हैद्राबादला ट्रेनिंगसाठी गेल्यामुळे ते रुजू होऊ शकले नव्हते. शुक्रवारी ते आपला पदभार स्वीकारणार आहेत.दरम्यान, अनिल पारसकर यांची वर्धा येथील कारकीर्द वाखाणण्याजोगी ठरली. एक वर्षभराच्या कालावधीत वर्धा येथे त्यांनी धडाकेबाज कारवाया करीत १२ कोटी रूपयांची अवैध दारू जप्त केली. विशेष म्हणजे त्यांच्या कार्यकाळात केवळ दोन पोलीस कर्मचारी लाच घेताना पकडले होते. त्यावरून त्यांनी प्रशासनावर वचक ठेवल्याचे स्पष्ट होत आहे.दरम्यान, २०१३-१४ मध्ये त्यांनी अंबाजोगाई येथे अपर अधीक्षक म्हणून काम पाहिलेले आहे. तेथेही त्यांनी अवैध धंद्यांवर धडाकेबाज कारवाया केल्या होत्या. बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी बनावट दारू, अवैध दारू सर्रासपणे विकली जाते. तसेच मटके, जुगार अड्डे चालविले जातात. यासह विविध बाबी क्राईमसाठी पोषक असल्याने त्यांच्यासमोर हे प्रमाण आटोक्यात आणण्याची मुख्य जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे. (प्रतिनिधी)
अधीक्षक अनिल पारसकर आज पदभार घेणार
By admin | Updated: May 22, 2015 00:35 IST