औरंगाबाद, दि. 8 : वैजापुर तालुक्यातील बाभुळगाव खुर्द येथे शेतकऱ्याने आपल्याच शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. भानुदास फकीरा तुपे (४५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार भानुदास तुपे यांचे प्रेत आज सकाळी त्यांच्याच शेतात झाडाला लटकलेले आढळून आले. यानंतर याबाबत शिवुर पोलिसांना माहिती देण्यात आली. तुपे यांच्या नावावर 3 एकर शेती होती. काही वर्षापुर्वी त्यांनी महाराष्ट्र बैंक व एका खाजगी फायन्स कंपनी कडून कर्ज घेतले होते. तुपे यांनी कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या केल्याचे यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.त्यांच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. या प्रकरणी शिवुर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.