जालना : शहरातील काही खाजगी माध्यमिक शाळांविषयी प्राप्त झालेल्या तक्रारींमुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाअंतर्गत अकरा पथकांनी मंगळवारी २२ शाळांची तपासणी केली. ही तपासणी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. या अचानक तपासणीमुळे खाजगी शिक्षण संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहेत. काही मोजक्या खाजगी माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी डोनेशन घेतले जात असल्याच्या तसेच क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी शिक्षण विभागाअंतर्गत ११ पथकांची स्थापना करून या पथकांकरवी प्रत्येकी दोन अशा एकूण २२ शाळांची मंगळवारी अचानक तपासणी करण्यात आली. प्रत्येक पथकात चार जणांचा समावेश होता. या पथकांनी त्या-त्या शाळेत जाऊन बंद खोलीमध्ये शाळेच्या रेकॉर्डची तपासणी केली. शाळेत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, जमा-खर्चाचे रेकॉर्ड तसेच इतर दस्तऐवजाची तपासणी यावेळी करण्यात आली. या अचानक तपासणीमुळे संबंधित २२ शाळांमधील मुख्याध्यापकांसह शिक्षक व शिक्षकेतर मंडळींची चांगलीच धावपळ उडाली. पथकाने तपासणीसाठी मागितलेले सर्व रेकॉर्ड काढून देण्यात येत होते. शहरात काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मान्यतेपेक्षा कमी आहे. अशावेळी बऱ्याच पालकांचा ओढा काही विशिष्ट शाळांकडेच असल्याचे तसेच काही शाळांमध्ये प्रवेशासाठी डोनेशन घेतले जात असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये मराठी मााध्यमातील शाळांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडे गेल्या काही दिवसांपूर्वी शाळांमधील प्रवेशासंबंधीच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे देशभ्रतार यांनी शिक्षण विभागाची बैठक घेऊन आतापर्यंतच्या प्रवेश प्रक्रियेचा आढावाही घेतला होता. मात्र त्यातून काही आढळून आले नव्हते. त्यामुळे देशभ्रतार यांनी संबंधित शाळांमध्ये विविध पथके पाठवून तपासणी करण्याचे ठरविले व त्याप्रमाणे संबंधितांना सूचना दिल्या. शहरात काही शाळांमध्ये पाल्यांच्या प्रवेशासाठी अद्यापही पालक प्रयत्नशील आहेत. त्यासाठी काही जण तर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातच चकरा मारताना दिसत आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू असताना ही तपासणी झाल्याबद्दल शिक्षण विभागातील जाणकारांमध्ये चर्चा सुरू आहे. प्रवेश प्रक्रिया सुलभ केल्याचा दावा काही खाजगी शिक्षण संस्था करीत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या पथकांनी केलेल्या तपासणीमध्ये काय आढळून आले, याकडे शिक्षणप्रेमींसह सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. काही ठिकाणी रेकॉर्डमध्ये त्रुटी?शहरात एकूण ३४ माध्यमिक शाळा आहेत. यापैकी २२ शाळांची अचानक तपासणी करण्यात आली. यामध्ये काही शाळांमध्ये रेकॉर्ड व्यवस्थितरित्या मिळून आले. मात्र काही ठिकाणी त्रुट्या आढळून आल्याचे समजते. मात्र याविषयी अधिकृत दुजोरा मिळाला नाही. सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत या पथकांकडून त्या-त्या शाळांमध्ये रेकॉर्डची तपासणी सुरू होती. काही शाळांमध्ये ही तपासणी सुरू असताना मुख्य प्रवेशद्वाराशिवाय शाळेचे अन्य दरवाजेही बंद करण्यात आल्याचे दिसून आले. शाळांच्या तपासणीबाबतचा अधिकृत तपशील मिळाला नाही.
शहरात २२ शाळांची अचानक तपासणी
By admin | Updated: June 25, 2014 01:06 IST