औरंगाबाद : गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करायचा आणि जमा झालेली वर्गणी सामाजिक कार्यावर खर्च करायची, ही वैचारिक परंपरा जपत कॅनॉटचा राजा व्यापारी गणेश मित्र मंडळाने यंदा वर्गणीतून अपंगांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शहरातील अनाथालयातील अपंगांची यादी तयार करून त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. सिडकोतील निराला बाजार म्हटले जाणारे कॅनॉट प्लेस परिसरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन १७ वर्षांपूर्वी गणेशोत्सव सुरू केला. यंदा हे मंडळ १८ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. कॅनॉटचा राजा व्यापारी गणेश मित्र मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत साध्या पद्धतीने येथे गणेशोत्सव साजरा केला जातो. भव्य स्टेज, डेकोरेशन, लायटिंग, डीजे यावर वर्गणी खर्च केली जात नाही. यासंदर्भात मंडळाचे पदाधिकारी ज्ञानेश्वर खेर्डेअप्पा यांनी सांगितले की, लोकांचा पैसा लोककल्याणासाठी वापरण्यात यावा, हे या मंडळाचे उद्दिष्ट आहे. यामुळे गणेशोत्सवात जमा होणारी वर्गणी दरवर्षी जनकल्याणावरच खर्च करण्यात येते. यंदा आम्ही शहरातील अनाथालयात असणाऱ्या शारीरिक अपंग विद्यार्थी- विद्यार्थिनींना दैनंदिन जीवनात लागणारे साहित्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. जी वर्गणी जमा होईल त्यातूनच मदत करण्यात येणार आहे. संतोष मुथा म्हणाले की, येथील एका व्यापाऱ्याला अर्धांगवायू झाला होता, सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन वर्गणी जमा केली व त्या व्यापाऱ्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली. याच माध्यमातून परिसराच्या सुरक्षिततेसाठी ३२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. राम दाभाडे यांनी सांगितले की, गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. जमा होणारी वर्गणी व खर्चातील पारदर्शकता हेच या मंडळाची जेमेची बाजू ठरत आहे. लोकमत भवन येथील बैठकीत अनिल सोलोमन, नंदू कवरे, बाळू सराटे, सतीश गुळवे, पंकज घोडके, दीपक मगरे, गोपाल सेठ, सचिन खंडेलवाल, विजय तावरे, राजू वेताळ, प्रवीण भोसले, प्रदीप राठोड, सागर सारडा, प्रमोद नगरकर, संदीप ज्ञाने, सतीश गुळवे, वीरेंद्र जावळे, अशोक इंगोले हे मंडळाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
वर्गणीतून अपंगांना मदत करणार
By admin | Updated: August 11, 2014 01:56 IST