हणमंत गायकवाड लातूरआॅनलाईन अर्ज, आधारकार्ड, बँक खाते आणि त्यांचे संलग्नीकरण अशा किचकट अटींमुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रस्ताव घटले आहेत. विद्यार्थ्यांच्या आधार कार्डचे बँक खात्याशी संलग्नीकरण केल्याशिवाय शिष्यवृत्तीच देऊ नये, असे शासनाचे आदेश आहेत. परिणामी, अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. २०१५-१६ मध्ये ३५ हजार ४८० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली होती. तर यंदा केवळ ७ हजार १५३ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या शिष्यवृत्ती प्रस्तावांचा आणि मंजूर झालेल्या शिष्यवृत्तीचा गेल्या तीन वर्षांतील आलेख पाहिला असता ही घट दिसत आहे. समाजकल्याण विभागाने शिष्यवृत्तीसाठी केलेले नियम महाविद्यालयांकडून पाळले जात नाही. त्यामुळे महाविद्यालय स्तरावर प्रस्ताव प्रलंबित आहेत. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्नीकरण केले जात नाही. शिवाय, आॅनलाईन अर्ज भरण्यातही काही त्रुटी राहतात. त्यामुळे प्रस्तावांचे प्रमाण कमी झाले आहे. २०१२-१३ मध्ये ३९ हजार ४७६ प्रस्ताव होते. त्यापैकी ३७ हजार ४८ मंजूर झाले. २०१३-१४ मध्ये ४२ हजार ११० प्रस्ताव दाखल झाले. तर ३९ हजार ६६५ मंजूर झाले. २०१४-१५ मध्ये ४० हजार ५२६ प्रस्ताव आले. त्यापैकी ३९ हजार २१९ मंजूर झाले. २०१५-१६ मध्ये ४१ हजार १६ प्रस्ताव आले. त्यापैकी ३५ हजार ४८० प्रस्ताव मंजूर झाले. तर २०१६-१७ मध्ये ३१ हजार १६९ प्रस्ताव आले. त्यापैकी केवळ ७ हजार १५३ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. हा आलेख पाहिला असता दरवर्षी शिष्यवृत्ती प्रस्ताव घटत आहेत. परिणामी, विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहत आहेत.
किचकट अटींमुळे घटले शिष्यवृत्तीचे प्रस्ताव !
By admin | Updated: January 2, 2017 23:57 IST