औरंगाबाद : जुन्याजाणत्या कलाकारांसह नव्या उमेदीच्या प्रतिभेलाही व्यासपीठ देणाऱ्या ‘श्लोक’ चित्रप्रदर्शनाचे आज थाटात उद्घाटन झाले. ख्यातनाम चित्रकार आनंद पांचाळ, स्प्रे पेंटिंगमधील तज्ज्ञ सुनील गोईया, सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष आशू दर्डा, ‘श्लोक’च्या संचालिका शीतल दर्डा व लोकमतचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यावेळी उपस्थित होते. गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने हे व्यासपीठ कलाकारांना उपलब्ध करून दिले जाते. अनेक नव्या दमाच्या कलावंतांना महानगरांमधील प्रतिष्ठित कलादालनात चित्रांचे प्रदर्शन मांडणे शक्य नसते. हे जाणून ‘श्लोक’ने हा पुढाकार घेतला. यात तैलरंग, जलरंगासह अॅक्रेलिक माध्यमातील चित्रांसह विविध माध्यमांचा उपयोग करून बनविलेल्या शिल्पाकृतीही मांडल्या आहेत. मराठवाडा, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांतून प्रदर्शनासाठी ५०० नामांकने आली होती. त्यातून १११ चित्रांची निवड झाली आहे. मान्यवरांनी या चित्रांचे परीक्षण करून अंतिम निकाल आयोजकांना दिला. याचे पारितोषिक वितरण येत्या १९ आॅक्टोबरला होणार असून, विजेत्यांशी लवकरच संपर्क साधण्यात येईल. १८ व १९ आॅक्टोबर हे दोन्ही दिवस प्रदर्शन लोकमत भवन, जालना रोड येथे सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.
श्लोक चित्रप्रदर्शन सुरू
By admin | Updated: October 17, 2014 23:56 IST