औरंगाबाद : छोट्यांना संधी दिली तर तेही व्यवहारज्ञान चटकन आत्मसात करू शकतात. नवनव्या गोष्टी शिकू शकतात. याचा अनुभव आस्था जनविकास संस्थेने ज्योतीनगर येथे छोट्या मुलांसाठी आयोजित केलेल्या भाजीमंडईमुळे आला. आपल्याकडीलच भाजी ताजी असल्याचे सांगत या विक्रेत्यांनी भरपूर व्यवसाय केला. या अनोख्या भाजी विक्रेत्यांचे नागरिक व पालकांनी कौतुक केले. मुलांना पाव, किलो, नग समजावेत, व्यवहारातील खाचाखोचा कळाव्यात, बोलीभाषा समजावी, दैनंदिन व्यवहारातील पैशांची देवाणघेवाण कळावी या हेतूने आयोजित या भाजीमंडईत नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. सुमारे ४० बाल विक्रेते, तर एक हजारांहून अधिक ग्राहकांनी येथे ताज्या भाज्या खरेदी केल्या. आस्था जनविकास संस्थेने ज्योतीनगरमधील कवितेच्या बागेत पारंपरिक खेळांचे शिबीर आयोजित केले आहे. शिबिराचा एक भाग म्हणून ८ मे रोजी या भाजीमंडईचा उपक्रम झाला. मुलांनी धोतर, झब्बा, टोपी, उपरणे तर मुलींनी नऊवार, सहावार साड्या नेसून भाज्या विकल्या. बटाटे, कांदे, शेवग्याचा शेंगा, टमाटे, गवार, मेथी, पालक, कोथिंबिरीने कवितेची बाग मंडई म्हणून फुलली होती. काही मुलांनी कडधान्ये, आंबे, कैरी, टरबूज, सरबत, पापड, पाणीपुरी, भेळीचे स्टॉल लावून भाजीमंडईचे रूप अधिक आकर्षक केले होते. भाजीमंडईसाठी लागणारे साहित्य मुलांनी घरूनच पॅक करून आणले होते, तर काहींनी तराजूत मोजून आपला माल विकला. पोत्यांवर बसून ओरडून हे छोटे विक्रेते ग्राहकांना हाक देत होते. यासाठी शिबिरातील इतर मुलांनी त्यांना मदत केली. संध्याकाळी ५.३० वाजता सुरू झालेली भाजीमंडई दोन तास चालली. भाजपाच्या महिला आघाडीच्या सरचिटणीस विजया रहाटकर, मनसेचे शहराध्यक्ष सुमित खांबेकर, शिवसेनेच्या ज्योती काथार, राजकीय पक्षांचे नेते, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी भाजी विकत घेतली. उपक्रमासाठी आस्थाच्या अध्यक्ष आरतीश्यामल जोशी, अश्विनी जहागीरदार, अंजू मुळे, रंजना तुळशी, स्मिता धवलशंख, आशा तेली, प्राजक्ता मुर्कीकर, रेखा क्षीरसागर, अंजली कालकर, वैभवी अभ्यंकर यांनी परिश्रम घेतले.
आस्थाच्या शिबिरात मुले बनले भाजी विक्रेते
By admin | Updated: May 12, 2014 00:38 IST