औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्च शिक्षणामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधन केले. या देशातील ते पहिले अर्थतज्ज्ञ होते. विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या संशोधकवृत्तीचा आदर्श घेतला पाहिजे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात गुरुवारी ‘स्वागत समारंभ’ आयोजित करण्यात आला. एम.ए. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. शिवाजी सांगळे होते. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले की, एकेकाळी सुवर्णभूमीचा देश म्हणून भारताची ओळख होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय वस्तूंना मोठी मागणी होती. याशिवाय रुपयाची किंमत ही जास्त होती. ब्रिटिश राजवटीत मात्र इंग्रजांनी भारतातील उद्योग पळविले आणि रुपयाचे अवमूल्यनही केले. तेव्हा भारतीय रुपयाचे ढासळते मूल्य, यावर बाबासाहेबांनी संशोधन केले. त्यांनी ‘प्रॉब्लेम आॅफ रुपी’ हा शोधप्रबंध सादर करून पीएच.डी. संपादन केली. शोधप्रबंधाच्या निष्कर्षातूनच या देशात ‘रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया’ची निर्मिती झाली. या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या संशोधकवृत्तीचा गुण जोपासला पाहिजे. जगात महासत्ता म्हणून आपणास पुढे यायचे असेल तर आपली अर्थसत्ता बळकट करावी लागेल. यासाठी दर्जेदार संशोन व संशोधक, अर्थतज्ज्ञ पुढे आले पाहिजेत, असेही कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले.यावेळी विभागप्रमुख डॉ. सांगळे, डॉ. विनायक भिसे, डॉ. धनश्री महाजन, डॉ. सुनील नरवडे, डॉ. कृतिका खंदारे, डॉ. अशोक पवार, डॉ. चंद्रकांत कोकाटे, डॉ. पुरुषोत्तम देशमुख आदींची उपस्थिती होती. दुपारच्या सत्रात विद्यार्थी व शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या संशोधकवृत्तीचा आदर्श घ्यावा
By admin | Updated: August 15, 2014 00:51 IST