जालना : शिक्षण विभागाने नुकताच शाळेत विद्यार्थ्यांचा सेल्फी काढून तो वरिष्ठांना पाठविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाच्या पालक तसेच शिक्षक वर्गातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींना सेल्फी योग्य तर काहींना अयोग्य वाटत असल्याचे लोकमत सर्वेक्षणातून समोर आले.दर सोमवारी दहा विद्यार्थ्यांचा गट तयार करून त्यांची सेल्फी काढण्याच्या सूचना शिक्षकांना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी संख्या वाढीसोबतच विद्यार्थ्यांना शाळेबद्दल आकर्षण वाढावे म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. या सेल्फी वादळावर लोकमतने सर्व्हेक्षण करून नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. यातून पालक आणि विद्यार्थ्यांना हा उपक्रम आवडला तर काही शिक्षकांना हा उपक्रम आवडलेला नाही. काही शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मजेसाठी हा उपक्रम चांगला वाटला. सर्वेक्षणातून नागरिकांना चार प्रश्न विचारण्यात आले. यात विद्यार्थ्यांची शाळेत सेल्फी काढणे योग्य वाटते का? या प्रश्नांवर ३० टक्के नागरिकांना हा उपक्रम अतिशय चांगला असल्याचे मत नोंदविले. २० टक्के नागरिकांना हे योग्य नसल्याचे वाटते तर तब्बल ५० टक्के नागरिकांना याबाबत काहीच नसल्याचे सांगितले. सेल्फीमुळे विद्यार्थी गळती कमी होईल का? या प्रश्नावर ४० टक्के नागरिकांना होय असे वाटते. ५० टक्के नागरिकांना गळती थांबणार नाही असे वाटते. १० टक्के नागरिकांना काहीच माहिती नाही.सेल्फीमुळे गुरूजींच्या कामांत भर पडेल का? यात शिक्षकांनाही तीव्र प्रतिक्रिया देत कामांत भर पडेल असे सांगून या निर्णयात सुधारणा करण्याचे सुचविले. यात ६५ टक्के नागरिकांना होय असे वाटते. ३० टक्के नागरिकांना नाही असे वाटते तर ५ टक्के नागरिकांना याबाबत काहीच माहिती नाही. सेल्फीमुळे गुणवत्ता वाढीस गती मिळेल का? ४० टक्के नागरिकांना होय असे वाटते. ३० टक्के नागरिकांना नाही असे वाटते. ३० टक्के नागरिकांना याबाबत काहीच माहिती नाही. एकूणच सेल्फीमुळे शाळांमध्ये चांगलीच चर्चा रंगात आली आहे. काही पालकांनी फोटोसाठी तरी विद्यार्थी शाळा बुडवणार नाही असे मत व्यक्त केले. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांची सेल्फी; नको पण, हो पण....!
By admin | Updated: November 9, 2016 01:15 IST