पाटोदा : मित्रांसमवेत पोहायला गेलेला सुमित संजय कुलकर्णी (१५, रा. माळी गल्ली, पाटोदा) हा रविवारी सकाळी ११ वाजता एका विहिरीत बुडाला. रात्री उशिरापर्यंत मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते.सुमित पाटोद्यातील भामेश्वर विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकत होता. रविवारी सकाळी ११ वाजता चार मित्रांसोबत तो घरापासून जवळच्याच विहिरीवर पोहण्यासाठी गेला होता. त्याला पोहता येत नव्हते. इतर मित्रांनी विहिरीत उड्या टाकल्यानंतर त्यालाही मोह आवरता आला नाही. मात्र उडी टाकल्यानंतर पाण्यातून बाहेर आलाच नाही. तो बुडाल्याचे लक्षात आल्यावर चारही मित्रांनी विहिरीबाहेर येत आरडाओरड करून गावात खबर दिली. त्यानंतर महिला-पुरुष विहिरीकडे धावले. विहीर पन्नास फूट खोल असून, जवळून मांजरा नदी गेल्याने त्यात भरपूर पाणी आहे. त्याचा शोध लागत नसल्याने नातेवाईक, ग्रामस्थ विहिरीजवळ तळ ठोकून आहेत. सात विद्युत पंपांद्वारे पाणी सोडण्यात आले; मात्र प्रवाह कमी होत नसल्यामुळे शोधकार्यात अडथळा आहे.पंचमीवर सावटसुमितने वैदिक शिक्षण घेतलेले होते. सकाळी जेवण न करताच तो घराबाहेर पडला. आई पंचमीच्या स्वयंपाकात व्यस्त असतानाच तो बुडाल्याची बातमी आली. पंचमीच्या सणावर दु:खाचे सावट आहे. नातेवाईकांनी टाहो फोडला. (वार्ताहर)
पाटोद्यात विद्यार्थी विहिरीत बुडाला
By admin | Updated: August 8, 2016 00:45 IST