लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहर आणि परिसरात बुधवारी (दि. ७) दुपारी दमदार पावसाने हजेरी लावली. तासभर बरसलेल्या पावसाने शहरातील सखल भागात पाणीच पाणी झाले. चिकलठाणा वेधशाळेत ९.४ मि.मी. पावसाची नोंद झाली.रेनकोट, छत्र्यांशिवाय बाहेर पडलेल्यांची पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली. रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याने रस्ते जलमय झाले होते. रस्त्यांवरून दुचाकी चालविणेही अवघड झाले होते. त्यामुळे वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे शहरातील अनेक सखल भागामध्ये पाणी साचले. खडकेश्वर, औरंगपुरा, घाटी परिसर, मध्यवर्ती बसस्थानक, जवाहर कॉलनी रोड, टीव्ही सेंटर चौक, सिडको परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. या रस्त्यावरील वाहतूक मंदावली होती. पावसामुळे शहराच्या वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला.शहरात ३ आणि ५ जून रोजी रात्री पावसाने हजेरी लावली होती. ६ जून रोजी विश्रांती घेतल्यानंतर ७ तारखेला बुधवारी दुपारी २.४५ वाजेच्या सुमारास शहरात पावसाला सुरुवात झाली. अवघ्या काही वेळेतच पावसाने चांगलाच जोर धरला. दुकानांचे शेड, बसथांबे, उड्डाणपूल आणि मिळेल त्या आडोशाला उभे राहून नागरिक स्वत: भिजण्यापासून वाचण्याचा प्रयत्न करीत होते. अनेकांनी तर भिजतच घर गाठले. चार वाजेपर्यंत पावसाने चांगलीच हजेरी लावली. अधूनमधून विजांचा गडगडाटही होत होता. रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहने बंद पडत असल्याचा अनुभव अनेकांना आला. त्यामुळे भर पावसात वाहन लोटण्याची कसरत अनेकांना करावी लागली. साचलेल्या पाण्यातून वाहने नेण्याऐवजी लांबचा वळसा मारून जाण्यास दुचाकीधारक प्राधान्य देत होते. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने दिलासा दिला. पावसात भिजण्याचा आनंदही अनेकांनी घेतला.
शहरात पावसाची दमदार हजेरी
By admin | Updated: June 8, 2017 00:41 IST