\लोहारा : शहरातील शिवाजी चौकात ट्रकखाली पाय गेल्याने साठ वर्षीय वृध्दा गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली आहे.सरस्वती अंबादास सुरवसे (वय ६० वर्ष) या भातागळी येथून लोहारा येथे आल्या होत्या. शहरातील शिवाजी चौकात आल्यानंतर उमरग्याकडे जाण्यासाठी जेवळी रोडकडे पायी जात होत्या. यावेळी पाटोदा रोडवरून आलेल्या ट्रक (क्र. एमएच २६/ ५५०६) चा त्यांना धक्का लागून त्यांचा पाय ट्रकच्या मागील चाकाखाली आला. ही बाब शेजारी थांबलेल्या नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे चालकाने लगेचच ट्रक जागेवर थांबविल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, यावेळी चाकाखाली सदर महिलेचा पाय गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. यावेळी श्रीनिवास माळी, जरीनाबी शेख, श्रीकांत भरारे, रमेश गोरे, इमाम तळणीवाले, अमोल फकीदाबादकर कार्तिक शिंदे आदींनी या महिलेस तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे प्राथमिक उपचार करून सदर महिलेस पुढील उपचारासाठी उमरगा येथे हलविण्यात आले. दरम्यान, अपघातग्रस्त ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
अपघातात वृद्धेचा पाय चेंगरला
By admin | Updated: December 9, 2015 23:53 IST