लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भीमा- कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरवादी संघटनांनी बुधवारी पुकारलेला बंद शहरात तणावपूर्ण शांततेत पार पडला. बंद काळात शहरात १३ ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. जास्त हिंसक जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी दोन ठिकाणी बंदुकीतून १६ राऊंड फायर केले. ७ ठिकाणी लाठीमार करावा लागला. जमावाच्या दगडफेकीत सहायक पोलीस आयुक्त, दोन निरीक्षकासह २४ पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत १३ गुन्हे नोंदवून ८४ जणांना जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथे सोमवारी आंबेडकरी अनुयायांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचे तीव्र पडसाद तीन दिवसांपासून शहरात उमटत आहेत. सोमवारी रात्री आणि मंगळवारी दिवसभर विविध ठिकाणी दगडफेक आणि वाहने जाळण्याच्या घटना घडल्या. बुधवारी सकाळपासून गारखेडा परिसरातील काबरानगर, शंभूनगर, जळगाव रोडवरील आंबेडकरनगर आणि मिसारवाडी, बीड बायपास, रामनगर, मुकुंदवाडी, संजयनगर आदी ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. बुधवारी राज्यव्यापी बंद पुकारण्यात आल्याचे मंगळवारीच लोकांना समजले होते. यमुळे बुधवारी व्यापाºयांनी दिवसभर दुकाने बंद ठेवून एक प्रकारे बंदमध्ये सहभाग नोंदविला. परिणामी शहरातील सर्वच बाजारपेठ आणि सिनेमागृहे बंद होती.आंबेडकरनगरमध्ये बुधवारी सर्वाधिक चार तास धुमश्चक्री सुरू होती. जमावाच्या दगडफेकीमध्ये सहायक पोलीस आयुक्त नागनाथ कोडे, पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती,पोलीस उपनिरीक्षक रेश्मा सौदागर, यांच्यासह २४ पोलीस कर्मचारी जखमी झाले. यातील काही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, उपायुक्त विनायक ढाकणे, उपायुक्त राहुल श्रीरामे, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे, सहायक आयुक्त सी. डी. शेवगण, गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे, सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि अन्य अधिकारी आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी तेथे धाव (पान २ वर)अफवांचे ‘कनेक्शन’ पोलिसांनी कापलेऔरंगाबाद : शहरातील वाढत्या उद्रेकाला सोशल मीडिया कारणीभूत असल्याचे समोर येताच प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून शहरातील इंटरनेट सेवा बंद ठेवली. केवळ एका मोबाईल कंपनीची सुरू असलेली सेवा बुधवारी दुपारी २ वाजेनंतर बंद झाली. नेट सेवा बंद करण्याचा निर्णय पोलिसांच्या पथ्यावर पडला आणि उद्रेकावर नियंत्रण मिळविता आले. इंटरनेट सेवा बंद असल्याने व्हॉटस्अॅप, फेसबुकसारख्या सोशल मीडियावरून व्हायरल होणारे चुकीच्या आणि आक्षेपार्ह मेसेजची देवाण-घेवाण बंद झाली. त्यामुळे अफवांवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना यश आले. नेट सेवा बंद केल्यामुळे उद्रेक थंडावला आणि पोलिसांनाही संशयितांची धरपकड करण्यास वेळ मिळाल्याने शहरातील परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यात यश आली.बीड बायपासवर रास्ता रोको करणाºयांना पोलिसांनी पिटाळलेबंददरम्यान रास्ता रोको करण्यासाठी बाळापूर शिवारात बीड बायपास रस्त्यावर सुमारे ३००-४०० जण आल्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. मुकुंदवाडी पोलिसांसह सिडको वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि शीघ्र कृतीदल, एसआरपीच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि रस्त्यावरील आंदोलनकर्त्यांना पिटाळून लावले. या रास्ता रोकोमुळे मात्र, बीड बायपासवर सुमारे अर्धा ते पाऊण तास दोन्ही बाजंूनी जाणारी वाहने थांबविण्यात आल्याने कोंडी निर्माण झाली. या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यानंतर पोलिसांनी राजनगर, विश्वकर्मानगर, पंचशीलनगर आणि जयभगवाननगर या वसाहतींमध्ये कोम्बिंग आॅपरेशन करून रास्ता रोको करणाºयांची धरपकड केली.बंदचा रुग्णालयांवर परिणाममहाराष्ट्र बंदमुळे उपचारासाठी बाहेरगावहून शहरात येण्याचे रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी टाळल्याचे बुधवारी पाहायला मिळाले. यामुळे घाटी रुग्णालयासह शहरातील खाजगी रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभागात बुधवारी तुरळक गर्दी राहिली.४मराठवाड्यासह लगतच्या भागातून दररोज घाटी रुग्णालयात येणाºया रुग्णांची संख्या मोठी असते. एकट्या बाह्यरुग्ण विभागात दररोज १५०० ते २ हजार रुग्ण उपचार घेतात; परंतु बुधवारी ‘ओपीडी’मध्ये अवघे १०६० रुग्ण आले.४दुसरीकडे खाजगी रुग्णालयांतील ओपीडीमध्येही अशीच काहीशी परिस्थिती राहिली. मंगळवारी डॉक्टरांच्या संपाने ओपीडी बंद होती, तर बुधवारी महाराष्ट्र बंदमुळे रुग्णांची संख्या घटली. शहरातील रुग्णालयांमधील रुग्णसेवा सुरळीत होती; परंतु रुग्णांची संख्या कमी होती, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) अध्यक्ष डॉ. रमेश रोहिवाल यांनी दिली.४घाटीतील ओपीडीत १०६० रुग्णांनी उपचार घेतल्याचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सय्यद अश्फाक यांनी सांगितले.आणखी १३ गुन्हेआंबेडकरनगर, काबरानगर, बीड बायपास आदी ठिकाणी पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी अनुक्रमे सिडको, जवाहरनगर आणि मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात बुधवारी वेगवेगळे सहा गुन्हे नोंदविण्यात आले. सिडको पोलिसांनी दहा दंगेखोरांना ताब्यात घेतले आहे. याशिवाय अन्य ठिकाणीही कोम्बिंग आॅपरेशन सुरू आहे.एसीपीसह २४ पोलीस कर्मचारी जखमीएसीपी कोडे, पोलीस निरीक्षक प्रजापती, महिला फौजदार रश्मी सौदागर, पोलीस कर्मचारी बी.जी. खडसन, प्रकाश खरात यांच्यासह २४ पोलीस हवालदार जखमी झाले. यापैकी सर्वाधिक १४ पोलीस अधिकारी कर्मचारी हे आंबेडकरनगर येथे जखमी झाले. गारखेडा परिसरातील शंभूनगर येथे ५ कर्मचारी, एमआयडीसी वाळूज परिसरात ५ आणि एमआयडीसी सिडको ठाण्यांतर्गत २ पोलीस जखमी झाला.अश्रुधुराचे फोडले२३ नळकांडेवारंवार वार्निंग देऊनही जमाव रस्त्यावरून हटत नाही आणि पोलिसांवर दगडफेक करणाºया जमावावर आंबेडकरनगर, बीड बायपास आणि एमआयडीसी वाळूज आदी ठिकाणी अश्रुधुराचे २३ नळकांडे फोडून जमावाला पांगविले.७ ठिकाणी लाठीचार्जआंबेडकरनगर, मिसारवाडी, शंभूनगर, वाळूज एमआयडीसी परिसर, एमआयडीसी सिडको परिसररमानगर, संजयनगर आदी ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पांगविले.पोलिसांची ६, तरखाजगी ७ वाहने फोडलीजमावाने वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या दगडफेकीत पोलिसांची सहा तर खाजगी व्यक्तींची ७ अशी एकूण १३ वाहनांची तोडफोड केली. सलग दुसºया दिवशी वाहनांचे नुकसान झाल्याने पोलिसांनी शहरातील गस्त वाढविली. तोडफोड करणाºया तरुणांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यांची धरपकड सुरू असल्याचे गुन्हेशाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी सांगितले.निष्पाप लोकांना मारहाण करून पकडल्याचा आरोपआंबेडकरनगर येथे पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन करून तरुणाची धरपकड सुरू केल्याचे कळताच भाजप कार्यकर्ते जालिंदर शेंडगे, माजी नगरसेवक संजय जगताप यांनी सिडको ठाण्यात जाऊन निष्पाप तरुणांची मुक्तता करण्याची मागणी केली. त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, दगडफेक करणाºयांना पोलिसांनी अटक करावी, मात्र नागरिकांच्या घराची दारे तोडून त्यांना उचलून नेण्यात आले.
तणावपूर्ण शांततेत पार पडला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:11 IST