तुळजापूर : गुटखा, दारूबंदी याशिवाय इतर व्यसनांच्या आहारी गेलेल्या युवा पिढीला आवरण्याचं सामर्थ्य साहित्य संमेलनात आहे़ साहित्य संमेलनातून नवोदितांना आत्मचिंतन करण्याची संधी मिळत असून, हे संमेलन मानवाला सुसंस्कृत बनवते, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केले़तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित २२ व्या नवोदित साहित्य संमेलनाचे गुरूवारी उद्घाटन करण्यात आले़ यानिमित्त डॉ़ बाबासाहेब आंबेडकर साहित्यनगरीत काँ़ गोविंद पानसरे विचारपीठावरून संमेलनाचे स्वागताध्यक्ष लक्ष्मण ढोबळे हे बोलत होते़ प्रारंभी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार काळभोर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले़ यावेळी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मोरेश्वर मेश्राम, स्वागताध्यक्ष लक्ष्मण ढोबळे, निमंत्रक दिलीपराव कोद्रे, पत्रकार मंदार फणसे, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष शरद गोरे, सरचिटणीस दशरथ यादव, पत्रकार राजेंद्र माने, रा. स.प.चे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब जोब्दे, विशाल सोनटक्के, अतुल गायकवाड, डॉ. ज्ञानेश्वर चित्ते यांची उपस्थिती होती. यावेळी मंदार फणसे म्हणाले, देशातील बऱ्याच राज्यात मराठी भाषा बोलली जाते़ येणाऱ्या काळात ग्रामीण भागावर मराठी भाषा अवलंबून राहणार असल्याने ग्रामीण भागातून जागतिक दर्जाचे साहित्य निर्माण करणारे साहित्य निर्माण करण्याचे काम करणार आहोत़ तर साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष शरद गोरे म्हणाले, साहित्य संमेलने ही माणसाला नवी दिशा देण्याचे काम करीत आहेत. चुकलेल्या माणसाला चांगला मार्ग दाखविण्याचे काम साहित्यिकांनी करावे, असे आवाहनही त्यांनी केले़ तसेच समीर जगे, राजकुमार काळभोर, राजेंद्र माने, मोरेश्वर मेश्राम यांनीही मनोगत व्यक्त केले. शेवटच्या सत्रात साहित्य परिषदेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल मंदार फणसे यांना छत्रपती शाहू महाराज आदर्श पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर समीर जत्रे, विशाल बोरे, विजय वडवराव, डी. बी. थोरात, संजय सावंत, विठ्ठल मोरे, राजेंद्र माने, अनिल खंदारे, बाळासाहेब हाडोंग्रीकर, खंडेराव जगदाळे यांना गौरविण्यात आले. यावेळी साहित्यिक, कवी, कथाकार, साहित्यप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परिषदेचे विश्वस्त सतीश मडके यांनी तर आभार अतुल गायकवाड यांनी मानले. (वार्ताहर)
व्यसनाधीन युवा पिढीला आवरण्याचं सामर्थ्य साहित्य संमेलनात : ढोबळे
By admin | Updated: May 22, 2015 00:31 IST