औरंगाबाद : घाटी रुग्णालयात शनिवारी निवासी डॉक्टर्स आणि परिचारकाला (ब्रदर) मारहाणीच्या घटनेनंतर सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला. यासंदर्भात सोमवारी प्रभारी अधिष्ठाता डॉ. बी. एस. खैरे आणि निवासी डॉक्टरांची मार्ड संघटना, परिचारिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी मारहाणीच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घाटी रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट होण्यासाठी बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. यावेळी मार्डचे डॉ. ऋषिकेश चेवले, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या कार्याध्यक्षा इंदूमती थोरात यांची उपस्थिती होती. घाटी रुग्णालयात रुग्णांच्या सोबत आणि भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांची कायम गर्दी असते. त्यामुळे वारंवार होणाऱ्या मारहाणीच्या घटना रोखण्याच्या दृष्टीने रुग्णांना भेटण्यासाठी असलेल्या वेळा निश्चित करणे आणि त्याचे काटेकोरपणे पालन करण्याची सूचना बैठकीत करण्यात आली. रुग्णांना भेटण्यासाठी जाणाऱ्या नातेवाईकांना व्हिजिटर्स पास देण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. शनिवारी पहाटे निवासी डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आले नव्हते. त्यामुळे सध्याची सुरक्षा व्यवस्था बदलण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. अशा घटनांच्या वेळी योग्य पाऊल उचलण्यासाठी सुरक्षारक्षकांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्याची सूचना बैठकीत करण्यात आली. तसेच घाटी रुग्णालयाच्या परिसरातील बेशिस्त पार्किंगला शिस्त लावण्याची सूचना करण्यात आली.
सुरक्षा व्यवस्था होणार बळकट
By admin | Updated: June 2, 2015 00:28 IST