दिनेश गुळवे बीडराज्यात खळबळ उडविणाऱ्या तेलगी घोटाळ्यानंतर मुद्रांक विक्री व खरेदी संदर्भात कडक नियम तयार करण्यात आलेले आहेत. तसेच अगोदरच्या नियमांचीही काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. असे असले तरी बीड शहरात काही मुद्रांक विक्रेत्यांनी या नियमांची पायमल्ली करीत आपला ‘गोरख धंदा’ मांडला आहे. दिलेल्या किंमतीपेक्षा अधिक रक्कम घेऊन ग्राहकांची चक्क आर्थिक लूट सुरू असल्याची बाब ‘लोकमत स्टिंग आॅपरेशन’ मधून समोर आली आहे. गंभीर बाब म्हणजे ‘नको त्या कटकटी’ म्हणून कोणी तक्रार करण्यास पुढे येत नाही, यामुळे संबंधितांवर कारवाई कशी करावी, असा प्रश्नही जिल्हा मुद्रांक विक्रेत्यांकडून विचारला जात आहे. शेती, भूखंड खरेदी-विक्री व्यवहार असो अथवा शपथपत्र किंवा शासकीय कामासाठी मुद्रांकाचा वापर केला जातो. यातून शासनास मोठ्या प्रमाणावर आर्थिक महसूल मिळतो. विविध कारणासाठी शंभर, पाचशे, हजार, दहा हजार ते पंचविस हजार रुपयांपर्यंत मुद्रांक खरेदी केले जातात. मुद्रांक विक्री करणाऱ्यांसाठी (वेंडर) शासनाने अनेक नियम घालून दिले असले तरी याची बीड शहरात सर्रास पायमल्ली होत असताना दिसून येत आहे. राज्यात २००५ मध्ये मुद्रांक घोटाळ्यासंदर्भात ‘तेलगी’ प्रकरणाने खळबळ उडाली होती. तीस हजार कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात अब्दुल करीम तेलगी याच्यासह तत्कालीन आ. अनिल गोटे यांना कारागृहात जावे लागले होते. याप्रकरणाने राज्यात ‘मुद्रांक गेट’ प्रकरण समोर तर आलेच शिवाय त्याची साखळी असल्याचेही समोर आले. या प्रकरणाने खडबडून जाग्या झालेल्या प्रशासनाने मुद्रांक खरेदी-विक्री संदर्भात आणखी नियम तर केलेच शिवाय हा व्यवहार अत्यंत पारदर्शकपणे करण्यासाठी सूचनाही केल्या. असे असले तरी आज बीड शहरात काही मुद्रांक विक्रेत्यांनी सामान्यांची लूट चालविली आहे. मुद्रांक विक्रेत्यांना सरासरी तीन टक्के मुद्रांक विक्रीमागे ‘कमीशन’ दिले जाते, हाच मुद्रांक विक्रेत्यांचा नफा असतो. असे असले तरी काही मुद्रांक विक्रेते चक्क शंभर रुपयांचा मुद्रांक ११० रुपयांना विक्री करतात तर पाचशे रुपयांचा मुद्रांक ५५० रुपयांना विक्री करतात. यामुळे सामान्य नागरिकांची आर्थिक लूट होत आहे. शहरातील तहसील कार्यालयाच्या आवारात मुद्रांक विक्रेते बसतात. येथे काम घेऊन येणाऱ्या ग्रामस्थांची संख्याही मोठी असते. ग्रामीण भागातील येणाऱ्या ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर मुद्रांक विक्रीमधून येथे आर्थिक लूट केली जात असल्याचे यावेळी स्टिंग दरम्यान दिसून आले.
मुद्रांकांचा 'गोरखधंदा'
By admin | Updated: August 7, 2014 23:34 IST