लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकरी संपाची धार अधिक तीव्र करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह संभाजी ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेतला आहे. रविवारी जालना, राजूर, टेंभुर्णी येथील बाजारात भाजीपाला विक्री बंद करून विक्रेत्यांना परतवण्याचा प्रयत्न संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. राजुरात मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, तर जालन्यात बाजारात राडा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.जुना जालन्यातील रेल्वे स्थानक रस्त्यावर भरणारा रविवार बाजार बंदची हाक संभाजी ब्रिगेडने दिली होती. यास प्रतिसाद देत पंचक्रोशीतील अनेक शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला विक्रीसाठी आणलाच नाही. पाच वर्षांपासून भरणाऱ्या या बाजारात पंचक्रोशीतून भाजीपाला विक्रीसाठी आणणारे शेतकरी आणि शहरातील नोकरदार वर्ग यांचे एक आपुलकीचे नाते तयार झाले आहे. सकाळीच सहावाजेपासून दिसणारी शेतकऱ्यांची लगबग आज पाहायला मिळाली नाही. बाजारात ज्या जागेवर ग्रामीण शेतकरी बसतात, तिथे शहरातील भाजीविके्रेते बसलेले दिसल्यामुळे नेहमी बाजारात येणाऱ्यांनी याबाबत आवर्जून विचारणा केली. दरम्यान, बाजार बंदची हाक दिल्यानंतरही दुकाने थाटणाऱ्या विक्रेत्यांना संभाजी ब्रिगेडचे संतोष गाजरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून देत परतवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोनि. बाळासाहेब पवार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलन करणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर बाजारात दिवसभर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.संपकरी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य न झाल्यामुळे ग्रामीण भागात आंदोलनाची धार अधिक तीव्र होताना दिसत आहे. राजूरच्या रविवार बाजारात आजूबाजूच्या ३५ ते ४० गावांमधून शेतकरी, व्यापारी व नागरिक खरेदी-विक्रीसाठी येतात. स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी सकाळी हा आठवडे बाजार बंद केला. मुख्य रस्त्यावर विक्रीसाठी आलेला भाजीपाला फेकून दिला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवकांनी दूध रस्त्यावर फेकून सरकार विरोधी घोषणा दिल्या. काही व्यापाऱ्यांनी दुपारनंतर बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर दुकाने लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यास तीव्र विरोध केल्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तणाव निवळला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जपुरवठा करा, शेतमालास हमी भाव द्यावा आदी मागण्या आंदोलकांनी केल्या. आंदोलनात गजानन बंगाळे, सदाशिव जायभाये, निवृत्ती शेवाळे, बळीराम पुंगळे, रावसाहेब मालुसरे, विष्णू सानप, काकासाहेब साबळे, रमेशअप्पा रेनगाडे, वैजिनाथ ढोरकुले, भारत मगरे, राजू जगताप, धनराज राठोड, रमेश राठोड, जयसिंंग राठोड यांच्यासह शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी बाजारात विक्रीस आलेला भाजीपाला शेतकऱ्यांनी विकू दिला नाही. धान्य मालाची मंदावलेली आवक व हमाल, मापाडी संघटनेने ठेवलेला बंद यामुळे जालना कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शुकशुकाट पाहायला मिळाला.
शेतकऱ्यांचा रास्ता रोको
By admin | Updated: June 5, 2017 00:26 IST