औरंगाबाद : शहरातील रुग्णालयांमधील कचरा जमा करण्यासाठी महापालिकेने नाशिक येथील वॉटर ग्रेस या कंपनीची नेमणूक केली आहे. मागील सहा महिन्यांपासून कंपनी दररोज कचरा उचलून नेत नाही. त्यामुळे पोलिसांनी रुग्णालयांवर थेट गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू केली आहे. कंपनीच्या त्रासामुळे विनाकारण डॉक्टर भरडले जात आहेत. बायोमेडिकल वेस्टचा हा त्रास थांबवा, अशी मागणी शुक्रवारी शहरातील सर्व डॉक्टरांनी मनपा आयुक्तांकडे केली.इंडियन मेडिकल असोसिएशनने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील सर्व रुग्णालयांनी महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे रीतसर रजिस्ट्रेशन केले आहे.मागील काही दिवसांपासून बायोमेडिकल वेस्टच्या मुद्यावर डॉक्टरांना वेठीस धरण्यात येत आहे. महापालिकेने कचरा उचलण्यासाठी नेमलेल्या कंपनीचे कर्मचारी दररोज येत नाहीत. त्यामुळे रुग्णालयांमध्ये कचरा तसाच पडून राहतो. अनेकदा यावरून प्रदूषणाचा गंभीर प्रश्नही निर्माण होतो.महापालिका प्रशासन आणि वॉटर ग्रेस कंपनी यासंदर्भात अजिबात गंभीरपणे विचार करीत नाही. मागील काही दिवसांपासून शहरातील डॉक्टरांवर गुन्हे नोंदविण्याचे सत्र सुरू करण्यात आले आहे. बायोमेडिकल वेस्टच्या मुद्यावर डॉक्टरांना धमक्या, ब्लॅकमेल आणि खंडणी मागण्याचे प्रकारही सुरू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुळात बायोमेडिकल वेस्ट नॉन अॅलोपॅथीच्या डॉक्टरांकडे अधिक जमा होतो. महापालिका त्यांची नोंदणी करायला तयार नाही. मनपाने शहरातील सर्व जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांची नोंदणी करावी. महापालिकेच्या प्रत्येक सामाजिक उपक्रमात शहरातील सर्वच डॉक्टर पुढाकार घेतात. महापालिकेला नेहमीच सहकार्य करण्याची भूमिका डॉक्टरांची असते. अलीकडे ज्या डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते त्वरित मागे घेण्यात यावेत. बायोमेडिकल वेस्टचा वाढलेला त्रास कमी करावा, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी आयएमएचे अध्यक्ष दत्ता कदम, सचिव महेश मोहरीर यांच्यासह शंभरहून अधिक डॉक्टर उपस्थित होते.
बायोमेडिकल वेस्टचा त्रास थांबवा
By admin | Updated: August 17, 2016 00:55 IST