वाळूज महानगर : राज्य कामगार विमा योजनेच्या लाखो कामगार व रुग्णांना पुरेशा आरोग्य सुविधा मिळत नसल्यामुळे त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची हेळसांड होत आहे. या कामगार रुग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी राज्य विमाधारक कामगार संघटनेने आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्याकडे केली आहे.राज्य कामगार विमा योजनेचे शहरात १०० खाटांचे रुग्णालय असून, तेथे अनेक सुविधांचा अभाव आहे. रुग्णालयातील डॉक्टर्स गंभीर आजारी रुग्णांवर व्यवस्थितपणे उपचार न करता त्यांना घाटी रुग्णालयात जायचा सल्ला देतात. या रुग्णालयात रोज तपासणी व उपचारांसाठी जवळपास ७०० ते ८०० रुग्ण येतात. तरीही केवळ तीन डॉक्टर्स उपलब्ध आहेत. याविषयी सतत पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्यामुळे कामगारांनी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांना अडचणी सांगितल्या.तीन कोटींची बिले प्रलंबितआम्ही खाजगी रुग्णालयात उपचारांवर केलेला खर्च आम्हाला त्वरित दिला जात नसल्यामुळे आम्हाला उधार-उसनवारी तसेच कर्ज काढावे लागत असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. वाळूज औद्योगिक वसाहतीतील जवळपास १ हजार ५०० कामगारांची तब्बल ३ कोटी रुपयांची बिले कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत.शेट्टी यांनी रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली असून, इतर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी कामगार प्रतिनिधींची बैठक मुंबईत आयोजित केली जाणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.राज्य कामगार विमा योजनेचे केंद्रीय स्तरावरील महामंडळाकडे हस्तांतर करावे, राज्य कामगार विमा रुग्णालयातील सर्व संवर्गातील रिक्त पदे त्वरित भरावीत, रुग्णालयात आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध करून द्यावी, गंभीर रुग्णांना उपचारासाठी घाटीत न पाठविता टायअप रुग्णालयात पाठविण्यात यावे, अकोला येथील स्थलांतरित सेवा रुग्णालय चितेगाव येथे सुरू करावे, कामगारांनी प्रलंबित देयके निकाली काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करावी आदी मागण्यांचे निवेदन राज्य कामगार विमाधारक कामगार संघटनेचे सरचिटणीस प्रकाश जाधव, किशोर सरोदे, राजू डोईफोडे, संतोष दळवी, गोविंद सोलपुरे यांनी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांना दिले.
ईएसआय कामगार रुग्णांची हेळसांड थांबवा
By admin | Updated: July 23, 2014 00:40 IST