वेरूळ : वेरूळ फाट्यावरील महामार्गावर पाचपीरवाडी येथील ग्रामस्थांनी स्मशानभूमीसाठी जागा मिळावी, या मागणीसाठी शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन केले.धनसिंग फकीरचंद सुलाने यांच्या मालकीच्या जागेवर पाचपीरवाडीचे ग्रामस्थ पहिल्यापासून अंत्यसंस्कार करीत होते; परंतु जमीन मालकानेच आता अंत्यसंस्कार करण्यासाठी मनाई केल्याने मोठी समस्या पाचपीरवाडीत निर्माण झाली आहे. सदरील पाचपीरवाडीला गावठाण नसल्याने स्मशानभूमीचा प्रश्न समोर आला आहे.पाचपीरवाडी गावात कोणाचेही निधन झाल्यास त्यांच्याच शेतात अंत्यसंस्कार केले जातात; परंतु जे भूमिहीन आहेत त्यांना स्मशानभूमीअभावी आप्तस्वकीयांच्या चिता घरासमोरच पेटवाव्या लागत आहेत. त्यामुळे सर्वच ग्रामस्थांनी तहसीलदारांना लेखी निवेदन दिले. संतप्त ग्रामस्थांनी एकत्र येऊन गुरुवारी सकाळी ११ वाजता रास्ता रोको केला. जोपर्यंत स्मशानभूमी होत नाही, तोपर्यंत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सरपंच अंबरसिंग जंघाळे, विजयसिंग बिमरोट, त्र्यंबक ब्रह्मणावत, राजू नायमने, विष्णू काळे, आदबसिंग कवाळे, सुमनबाई एकतुरे, ललिताबाई कवाळे, भारताबाई जंघाळे, धरमसिंग सुलाने, धनसिंग जंघाळे, वाल्मीक जारवाल, जीवन जंघाळे, नेहरू जारवाल, गणेश कीर्तीकर, सुपडसिंग कीर्तीकर, सलीम सय्यद यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.मंडळ अधिकारी बेडवाल, तलाठी आर.एस. गिते यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार होऊ नये म्हणून फौजदार मेहेत्रे, काळे, सातदिवे, पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला. (वार्ताहर)
स्मशानभूमीसाठी रास्ता रोको आंदोलन
By admin | Updated: July 12, 2014 00:56 IST