अंबड : दुष्काळाने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना जालना येथील उपप्रादेशिक वाहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी अमानूष वागणूक दिल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास खरेदी-विक्री संघ कार्यालयासमोर घडली. अॅपेरिक्षाने नियमांचा भंग केल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे धान्याची पोती रोडवर फेकली. यावेळी पोते फुटून धान्य रस्त्यावर पसरले. शेतकऱ्यांना देण्यात येणारी अमानुष वागणूक पाहून संतप्त झालेल्या नागरिकांनी जालना-बीड मार्गावर रास्ता रोको केला. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी करत नागरिकांना पांगविले. विशेष म्हणजे याच मार्गावर शेकडो वाहनांव्दारे होणाऱ्या वाळू तस्करीसमोर नांग्या टाकणाऱ्या वाहतूक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. तालुक्यातील शिरसगाव तांडा येथील राजू बाबूलाल चव्हाण, संजय बिजू पवार, बंडू पांडुरंग राठोड या शेतकऱ्यांनी सोमवारी अंबड येथील मोंढ्यात धान्य नेण्यासाठी गावापासून जवळ असलेल्या करंजळा येथील श्रीहरी आमटे यांचा अॅपेरिक्षा भाड्याने केला. दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अंबड शहरात वाहतूक अधिकाऱ्यांनी हा अॅपेरिक्षा अडविला. यावेळी शेतकऱ्यांनी आम्हाला आमचे धान्य मोंढ्यात न्यायचे आहे. घरातील सदस्य दवाखान्यात असल्याने धान्य आजच विक्री करणे गरजेचे असल्याने आमचे धान्य रिक्षातून उतरुन घेऊ द्या, अशी विनवणी त्यांनी केली. यावेळी बाजरी व तुरीचे पोते फुटून धान्य रस्त्यावर पसरले. धान्य रस्त्यावर पसरताच शेतकऱ्यांच्या अश्रुंचा बांध फुटला. शेतकऱ्यांची अवस्था पाहून संतोष जेधे, सतिश ढवळे, विलास लांडे, अॅड.कृष्णा शर्मा, बाळासाहेब इंगळे, बाबू लोहकरे, जयसिंग राठोड, रामदास सागुते, बाबू लांडे, सचिन खरात, शिवा लांडे आदींनी वाहतूक अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यानंतर वाहतूक अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरुन काढता पाय घेतला, यावेळी संतप्त नागरिकांनी वाहतूक बंद पाडत रास्ता रोको केला. (वार्ताहर)
अन्यायाविरोधात अंबडला रास्ता रोको
By admin | Updated: February 2, 2016 00:24 IST